परतवाडा अंजनगाव मार्गावर अपघातांची मालिका सुरूच
एकाच आठवड्यात 5 ठार तीन गंभीर
दुचाकी अपघातात १ ठार १ जखमी
बैतुल- खामगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी अंजनगाव परतवाडा वर अपघाताची मालिका सुरूच असून एकाच आठवड्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असून तीन गंभीररीत्या जखमी झाले आहेत काल गुरुवार रोजी सकाळी ६ वाजता पथ्रोट नजिक पॉवर हाऊस जवळ झालेल्या दुचाकी अपघातात एक ठार तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
आठड्यापुर्वी सावळी दातुरा नजीकच्या बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर समोर झालेल्या कार व दुचाकी अपघातात दर्याबाद येथील अब्दुल गफ्फार शेख हुसैन व अब्दुल जलील अब्दुल रशीद रा. दर्याबाद हे दोघे ठार झाले होते तर कार चालक नीलेश दुर्बुडे आरोग्य सहाय्यक गंभीर जखमी झाला होता. दुसऱ्याच दिवशी पांढरी खानमपूर नजिक झालेल्या दोन दुचाकी अपघातात कोकर्डा लाखनवाडी येथील हर्ष उर्फ नितीन मधुकर देशमुख व नामदेव परसराम वानखडे यांना आपला जीव गमावावा लागला होता तर कुणाल जीवन खणवे पथ्रोट ह्या गंभीर जखमीवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत
आज अब्दुल कादिर शेख नजीर (वय ५८ वर्ष) रा. निमखेड बाजार हे लिंबू व्यापारी आपल्या दुचाकीने परतवाडा बाजारात जात असता पथ्रोट नजीकच्या पॉवर हाऊस जवळ त्यांच्या दुचाकीने मॉर्निंग वॉक करीता जात असलेल्या संतोष धारणे यास धडक दिली त्यात संतोषला किरकोळ दुखापत झाली तर अब्दुल कादिर हे रस्त्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याठिकाणी मॉर्निंग वॉक साठी आलेले वृतपत्र प्रतिनिधी प्रमोद निर्मळ यांनी लगेच पोलीस स्टेशनला माहिती देवून गोपाल कडू, अँड.लाड, सचिन मेश्राम, रजत उके व अन्य लोकांच्या मदतीने गंभीर जखमीस पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.त्यानंतर त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला.