चांदूर रेल्वेत खाकीतील माणुसकी - भुकेल्यांना दिले जेवन
ठाणेदार मगन मेहते यांनी स्वत: दिले ताटात वाढून
चांदूर रेल्वे - प्रतिनिधी
पोलिस म्हटले की, खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दात बोलणारा, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते. त्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस म्हटले की, इतका धाक हवाच. पोलिसांना कर्तव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते. असे असले, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन, भावना असतात. ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो. अशाच चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी खाकीतील माणुसकीचे दर्शन देत शहरातील गरजु, भुकेल्यांना आंब्याच्या रसा सह जेवन दिले.
कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात काही वेळेपर्यंत दुकाने सुरू आहे व त्यानंतर कडन निर्बंध लागू आहे. अशा परिस्थित मात्र गरिबांचे, बेघरांचे अतोनात हाल होऊ लागले. बाहेर असणाऱ्या अनेकांना जेवन मिळणे ही कठीन होत आहे. अशा परिस्थितीत ठाणेदार मगन मेहते यांनी स्वत: पुढाकार घेत भुकेल्यांना जेवन वाटप केले. सदर जेवनामध्ये सद्या सिझन असलेल्या आंब्याचा रस सुध्दा दिला. विशेष म्हणजे ठाणेदार मगन मेहते यांनी स्वत: ताटात वाढून दिले. या सर्व प्रकारामुळे खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले होते. यावेळी चालक पंकज शेंडे, शहरातील जेष्ठ नागरिक अण्णा खंडेतीया आदींची उपस्थिती होती.