गॅसच्या दरात भली मोठी वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले. पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी शंभरी पार केल्याने जनता हैराण झालेली असताना, सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती व कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर आता तब्बल २५.५० रुपयांनी महागला आहे, तर कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ करण्यात आली.
देशातील विविध शहरांत आजपासूनच नव्या किमती लागू झाल्या
आहेत. याआधी १ जून रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल बदल करण्यात आलेले नव्हते. जूनमध्ये १९.२ किलो कमर्शियल सिलिंडरचे दर १२२ रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर कमर्शियल सिलेंडर १४७३.५०रुपये इतका होता, तर जूनमध्ये घरगुती सिलेंडरचा दर जैसे थे होता. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडरचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२१ मध्ये घरगुती गॅसच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. जानेवारी सोडता जवळपास सर्वच महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. ४ फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा ५० रुपयांनी वाढ झाली. तसेच 1 मार्च रोजी गॅस सिलिंडरचा दर पुन्हा एकदा २५ रुपयांनी वाढविण्यात आला. नंतर एप्रिलमध्ये १० रुपयांनी किमती कमी करण्यात आल्या होत्या.