राज्यात निर्बंध कायम; ‘अनलॉक’ विचाराधीन; मंत्री वडेट्टीवार बोलून यु-टर्न!
राज्यात निर्बंध हटविले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन, अनलॉकबाबत संभ्रम कायम
मुंबई :कोरोना संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यांत राज्यात अनलॉक केले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण आल्याने अनलॉक नेमके कसे होणार हे शासन निर्णय जारी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्रेक द चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथील करायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. निश्चित करण्यात येणाऱ्या निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याबाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे