काका ला मारले पुतण्याने
केज : केज तालुक्यातील दरडवाडी येथे पुतण्याने चुलत्याला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी दाताळ मारून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या सामाईक विहिरीवरून सामाईक पाईपलाईन केलेली आहे. या पाईपलाईनच्या कारणावरून अनेक वेळा गुरुलिंग दराडे व त्यांचे भाऊ गोरख दराडे आणि पुतणे श्रीहरी दराडे यांच्यात भांडणे होत असतात.
केज तालुक्यातील दरडवाडी येथे ता.१२ जून शनिवार रोजी सकाळी साडे अकराच्या. दरम्यान गुरुलिंग दराडे यांनी त्यांचा भाऊ गोरख दराडे आणि पुतण्या श्रीहरी दराडे यास पाईपलाईनचे टोपण का काढले? अशी विचारणा केल्यावरून गुरुलिंग दराडे यांना त्यांचा पुतण्या श्रीहरी दराडे याने शेतातील दाताळ लोखंडी अवजाराने मारहाण केली. तसेच त्यांचा सख्खा भाऊ गोरख दराडे याने लोखंडी पाईपने मारहाण केली. सीमा दराडे आणि सोनाली दराडे यांनी शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. यात गुरुलिंग दराडे यांच्या कपाळावर जखम झाली. आरडाओरड ऐकून जवळच शेतात पाळी घालत असलेला गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश दराडे हा पळत येऊन त्याने भांडणे सोडवली. तो जखमी वडील गुरुलिंग दराडे यास नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात घेऊन जात असताना पुन्हा गोरख दराडे याने गाडी अंगावर घालून ठार मारण्याची धमकी दिली. गुरुलिंग दराडे यांच्यावर नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून नंतर त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. परंतु जखमी गुरुलिंग दराडे यांची प्रकृती गंभीर होती; म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी गुरुलिंग दराडे हे अद्यापही बेशुद्ध आहे
गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश याने दि.१४ जून रोजी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार श्रीहरी गोरख दराडे, गोरख बारीकराव दराडे, सिमा गोरख दराडे आणि सोनाली श्रीहरी दराडे यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचे उद्देशाने घातक हत्याराने मारहाण करणे व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत