स्वस्त धान्याची अफरातफर
मारेगाव तालुक्यातील प्रकार, पोत्यामागे दोन किलो धान्याची घट.
प्रतिनिधी /पंकज नेहारे
मारेगाव : गोरगरिबांना अल्प दरात स्वस्त धान्य उपलब्ध होण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली कार्यान्वित केली; मात्र शासनाकडून वाटपासाठी येणार्या ५० किलो धान्याच्या पोत्यातून २ ते ३ किलो धान्याची अफरातफर करून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नियमापेक्षा कमी धान्यपुरवठा गोदामच्या लिपिका कडून होत आहे.अन्नधान्यापासून कोणताही घटक वंचित राहू नये, याकरिता शासनाने अन्नपूर्णा, अंत्योदय, अन्न सुरक्षा आदी योजना कार्यान्वित आहेत. या अंतर्गत गहू २ रुपये, तांदूळ ३ रुपये रुपया किलोप्रमाणे उपलब्ध करून दिली. गोरगरीब शेतमजुरांसाठी या योजना जीवनदायी ठरल्याने योजनेचा लाभ हजारो लाभार्थी घेत आहेत. शासनाकडून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपासाठी गहू, तांदूळ, ज्वारी आदीचे ५० किलोचे पोते येथील धान्य गोदामावर उतरविण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून येथील स्वस्त धान्याचे शासकीय गोदामाचे लिपिक हे पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून कित्येक महिन्यांपासून शासनाकडून प्राप्त होणार्या स्वस्त धान्याच्या ५० किलोच्या पोत्यातून २ ते ३ किलो धान्याची अफरातफर करीत आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे अन्नधान्याचे वाटप न होता अपुरा धान्यसाठा मिळतो. स्वस्त धान्य दुकानदारांकडून योजनेतील लाभार्थ्यांना पूर्ण धान्याचे वाटप होत नाही. शासकीय नियमाप्रमाणे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना स्वस्त धान्याचे वाटप न करणार्या गोदामाच्या लिपिकाचा मनमानी कारभाराला कंटाळून अनेक वेळा तक्रारी केल्या. तरीसुद्धा याबाबत कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही. गोदाम लिपिक हे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे मालाचे वाटप करीत नाही. अन्नधान्य वाटपाच्या दिवशी लिपिक व पुरवठा निरिक्षक गोदाम लिपिका कडून स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय नियमापेक्षा कमी अन्नधान्याचा पुरवठा होणे ही गंभीर बाब असल्याचे तालुक्यातील गंभीर बाबीकडे लक्ष देऊन वरिष्ठ अधिकारी दोषींवर काय कारवाई करले याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.