यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे कपाशी पिकाचे खत व कीडरोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन
प्रतिनिधी/यवतमाळ
रिलायंस फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशी पिकाचे खत नियोजन या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि. २३-०६-२०२१ रोजी करण्यात आले.
या ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये शेतकऱ्यांनी कपाशी पिकासाठी खत व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन,तणनाशक,सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन कसे करावे तसेच सोयाबीन पिकाला कोणते खत दयावे असे विविध प्रश्न तज्ज्ञांना विचारले.
ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉ. डी. एस कंकाळ सहाय्यक प्राध्यापक यांनी कमी खर्चामध्ये खत नियोजन कसे करावे, खत किती वेळा दयावे असे उत्तम मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले तसेच डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रो. राजेंद्र जाणे यांनी निंबोळी अर्क कीडरोगासाठी किती महत्वाचा आहे हे सांगितले अश्या पद्धतीने तज्ज्ञांनी शेतकऱ्याचे मनोबल वाढविले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा तज्ज्ञांचे मार्गदर्शन उत्तम प्रकारे ऐकले त्यामुळे शेतकऱ्यांचे खत व्यवस्थापन व्यवस्थित होईल आणि कीडरोगावर सुद्धा नियंत्रण होईल या अनुषंगाने हा कार्यक्रम उपयुक्त झाला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.