Type Here to Get Search Results !

स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचे भाष्य…

स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचे भाष्य…

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता तरी काँग्रेसकडून स्वबळाची भाषा, याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिले उत्तर


मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी यात मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जात आहे. याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना उत्तर दिले. “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. शिवसेनाही स्वबळाचा नारा देईल. स्वबळ पाहिजेच. तो शिवसेनेचा हक्कच आहे,” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. हे सांगताना स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका नाही, असेही त्यांनी नमूद केले
उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही स्वबळाचा नारा देऊ. स्वबळ तर पाहिजेच. ताकद तर कमावलीच पाहिजे. आपले बळ असलेच पाहिजे. पण स्वबळाचा नारा म्हणजे काय हे आधी समजून घेतले पाहिजे. स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ होय. माझ्यासाठी स्वबळाचा तोच अर्थ.”“आपले बळ असायलाच पाहिजे. स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिले. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाची किंमत क्षुल्लक असताना आणि अपमानजनक जीवन जगताना बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाच, न्याय्य हक्क मागण्यासाठी स्वबळ हवे. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी हे आहे स्वबळ. निवडणुका तर होत असतात. जिंकणे आणि पराभव होत असतात, पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक असते,” असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, “मागील निवडणुकीत आपले काही उमेदवार पराभूत होते. त्यांना सांगितले तुम्ही पराभूत झाला असला तरी मनाने खचलेले नाहीत. हे बळ आहे ते स्वबळ आहे. अनेक संकटे आली. त्या संकटांना घाबरुन चालणार नाही. घाबरलो तर मी शिवसैनिक कसला, मी माँ आणि बाळासाहेबांचा मुलगा कसला. आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावर बसा.”

आघाडी किती दिवस टिकणार, उद्धव ठाकरेंकडून रोखठोक भाष्य
उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर थेट भाष्य केले. आघाडी किती दिवस टिकणार, असे म्हणत त्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला सूचक इशारा देतानाच शिवसैनिकांनाही तयार राहण्यास सांगितले. “देशाभिमान पहिला, आमचे हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडले का असे विचारले जाते. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करू नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करू नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवणे, त्यासाठी काही करत असू तर याचा अर्थ हे सोडले आणि ते धरले, असा त्याचा अर्थ होत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies