वणी :- तालुक्यातील वेळाबाई येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावाच्या सरपंच सौ. रंजना शंकर बांदूरकर यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. सिंधुताई डाहुले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम घेण्यात आले तसेच महिला सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. रंजना शंकर बांदूरकर यांनी आपल्या भाषणातून महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजात पुढे यावे, तसेच प्रत्येक महिलेला स्वतःच्या हक्कांची जाणीव होऊन ती सक्षम बनली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना नवचैतन्य व आत्मविश्वास मिळाला.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन मडावी ताई यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अंजूताई डाहुले यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी गावातील कुमारी पूजा संपत पेंदाने हिची नुकतीच भूमी अभिलेख विभागामध्ये निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून तिचे कौतुक केले. तसेच केशवनगर गट ग्रामपंचायत येथील गजानन मरस्कोल्हे यांची आरोग्य विभाग, गडचिरोली येथे निवड झाल्याबद्दल त्यांच्या आईचा देखील सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सौं मनिशा ताई डाहुले सौ. ज्योतीताई डाहुले, सौ. मीनाताई डाहुले, सौ. आशाताई खोले, सौ. आशाताई ढाकणे, सौ. रज्जुताई वाढणकर तसेच गावातील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम सुंदर रीतीने पार पाडला.
या कार्यक्रमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देत गावातील महिलांना पुढे जाण्याची प्रेरणा देण्यात आली. कार्यक्रमाला गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.