चाळणी झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा
🔸करणवाडी ते खैरी रस्त्याची दुरावस्था
🔸मनसे चे उपविभागीय अभियंता यांना निवेदन
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते खैरी रस्त्याची पूर्णतः चाळणी झाल्याने यथावकाश पायदळ चालणे दुरापास्त होत असल्याने सदरील रस्त्याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे कामे करण्यात यावे अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
करणवाडी ते खैरी पर्यंतच्या रस्त्यावर नको त्या पद्धतीचे खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी गिट्टी उखडून रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. चारचाकी वाहनासह दुचाकी सोबत पायदळ चालणे कठीण झाल्याची मागील अनेकवर्षापासूनची समस्या नागरिकांच्या मानगुटीवर बसून आहे.मात्र संबंधित विभाग निद्रावस्थेत दिसते आहे.या रस्त्याकडे कमालीचे दुर्लक्ष हेतुपुरस्सर ठरत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मारेगाव सह कुंभा हे परिसरातील गाव खेड्याचे मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्याने येणे जाणे करणे मोठी कसरत ठरत असतांना किंबहूना रस्त्याची चाळणी नागरिकांच्या जिवावरही बेतत आहे.त्यामुळे सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव यांना दिलेल्या निवेदनावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , तालुका अध्यक्ष अविनाश लांबट , शहर अध्यक्ष नबी शेख , प्रशांत चौधरी , सुरेश लांडे , नितीन खंडाळकर , जमीर सय्यद , सुरज सोनूले , गजानन बोथले , अंकुश वैद्य , अमोल साबरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.