बोटोणी येथील चिखलमय रस्ते..नागरिकांच्या जीवावर उठले ..!
🔸वारंवार सूचना / निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
🔸तात्काळ रस्ते- नालीचे काम करण्याची मागणी
ग्रामविकासात महत्वाची भूमिका पार पाडणारी ग्रामपंचायत प्रशासन बोटोणी येथे सपशेल नापास होत असल्याचे दिसून येत आहे.येथील काही वार्डातील चिखलमय रस्त्याने पायदळ चालणेही दुरापास्त होत असल्याने या विदारक परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्काळ नाली व रस्ते बांधकामाचे नियोजन करण्याची आग्रही मागणी वार्ड नंबर एक च्या नागरिकांनी केली आहे.
येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असून ग्रामपातळीवरील विकास कामे नियोजन शून्य आहे.अनेक वार्डात नालीचे बांधकाम नसून रस्त्याचाही वानवा आहे.मात्र नागरिकांच्या या मूलभूत गरजेकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
परिणामी अनेक ठिकाणी सांडपाणी भर रस्त्यावर येत असून काही ठिकाणी डबके साचले आहे.त्यामुळे बोटोणीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
दरम्यान , ग्रामपंचायत प्रशासनापासून तर स्थानिक लोकप्रतिनिधींचे कमालीचे दुर्लक्ष कारणीभूत ठरते आहे. वार्ड नंबर १ ची अवस्था अत्यंत बिकट असून येथील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे.नेहमीचा दळणवळणाचा असलेल्या या रस्त्याने पायी चालणे दुरापास्त होत आहे.सदर रस्त्याने अनेकांची घसरगुंडी होत असून याबाबत वारंवार सूचना , निवेदन देऊनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चंद्रकांत कुमरे यांनी निवेदनातून केला आहे.या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय समोरच उपोषणास बसू असा इशारा दिला आहे.
बोटोणीचे जलशुद्धीकरण केंद्र बंद
जल ही जीवन म्हणणाऱ्या बोटोणी येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने नागरिकांची शुद्ध पाण्यासाठी कुचंबणा होत आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २०२० मध्ये खनिज विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राचे मधल्या काळात मेंटेनन्स नसल्याने स्पेअर पार्ट निकामी होत हा आँरो प्लॅन्ट बंद पडला आहे.ग्रामपंचायत च्या अक्षम्य दुर्लक्षाने येथील नागरिक शुद्ध पाण्यापासून गेल्या पाच दिवसापासून वंचित असल्याचे भयाण वास्तव आहे. आता शुद्ध पाण्यासाठी काही जण कोठोडा , घोगूलदरा येथे धाव घेत आहे.मात्र ज्यांच्याकडे आणण्याची व्यवस्था नसलेल्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ग्रामपंचायतच्या बेताल प्रवृत्तीने निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.