मारेगावात राज्यव्यापी आंदोलनाचे पडसाद...
फसव्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा रास्ता रोको
वाढत्या महागाईचे चटके बसत असतांना भरीसभर म्हणून जीवनावश्यक वस्तूवरही जीएसटी लावून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे सुपीक कार्य केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याने या विरोधात मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन आज दि.५ ऑगस्ट ला छेडण्यात आले.
बेरोजगारी , महागाई व अग्निपथ योजनेसह हुकूमशाहीचा मेळ घातलेल्या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेची पुरती बोळवण करीत जगणे असह्य केले आहे.विरोधात बोलणाऱ्यांना ईडी लावून लोकशाही संपविण्याचा घाट केंद्र सरकार कडून घातल्या जात आहे.त्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाही कडे जात असल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला.
स्थानिक नियोजित पेट्रोल पंप समोरील विशाल मंडपात काँग्रेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करीत माजी आमदार वामनराव कासावार , नरेंद्र ठाकरे , अरुणाताई खंडाळकर , उत्तमराव गेडाम , धनंजय आसुटकर , मारोती गौरकार आदींनी केंद्र सरकारच्या महागाई व अडेलतट्टू धोरणावर भाषणातून प्रहार केले.
त्यानंतर राज्यमहामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.काही वेळ रास्ता रोको आंदोलनानंतर आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सुटका केली.
"त्या"व्हिडीओची आंदोलनस्थळी खमंग चर्चेला प्रचंड उधाण
पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी २०२२ पर्यंत प्रत्येक सर्वसामान्यांना घरकुल, नळ , पाणी आदी वचनपुर्ती करण्याचे सुनियोजित अभिवचन दिले होते.तसा व्हिडिओ तूर्तास समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे.मात्र हे पंतप्रधानांचे हे वचन केवळ हवेत विरत असून हजारो लाभार्थी घरकुलापासून अजूनही कोसो दूर आहे.अनेकांच्या घरकुल योजनेवर गदा येऊन बहुतांश लाभार्थींना अर्धवट घरे , त्यात दरवाजे , खिडक्या नसल्याचे हे वास्तव आहे. पंतप्रधान यांनी केलेल्या वचनपूर्ती घोषणेला अवघे दिवस बाकी असतांना पंतप्रधान मोदी यांचे संभाषणच ध्वनिक्षेपकातून उपस्थित शेकडो आंदोलनकर्त्यांना ऐकविण्यात आल्याने उपस्थित व ऐकणाऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या जनतेला दिशाभूल करण्याच्या चर्चेला कमालीचे उधाण आले होते.