खा.बाळू धानोरकर यांची पूरग्रस्त भागाला भेट
🔸मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन
🔸पुरग्रस्तांची तात्काळ जिल्हाधिकारी यांचेसोबत भेट
मारेगाव : प्रतिनिधी
अतिवृष्टी व पुरस्थितीने दुसऱ्यांदा मेटाकुटीस आलेल्या पिडीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी विदारक पुरपरिस्थितीची पाहणी करीत तात्काळ मदतीचा ओघाचा अंमल करण्याचे अभिवचन दिले.
मारेगाव तालुक्यातील काही भागात पुरपरिस्थितीने शेतीची पूर्णपणे वाट लागली आहे.पंधरा दिवसांपूर्वी शेकडो हेक्टर जमिनीतील तूर , कापूस व सोयाबीन पिके पाण्याखाली गेले होते.यातून शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न करीत दुबार , तिबार पेरणी केली तोच परत मुसळधार पाऊस व बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गाने नदी नाल्यांना पूर येऊन वर्धा नदीच्या शेजारी असलेल्या शेतीतील पिके पाण्याखाली गेली.नव्हेतर काही गावांना पाण्याने विळखा घातला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक स्थिती मेटाकुटीस आली.
दरम्यान , खा.बाळू धानोरकर यांनी आज दि.११ आँगष्ट रोजी मारेगाव तालुक्यातील शिवणी , वनोजादेवी व दापोरा येथील पूरपरिस्थितीची विदारक पाहणी करीत जास्तीत जास्त हेक्टरी मदत देण्याची भूमिका विषद केली.तालुक्यातील शिवणी गाव पुनर्वसन करण्यावर आपण भर देण्याचे सूतोवाच केले.परिणामी , पूरपरिस्थितीचा फटका बसलेल्या प्रत्येक गावातील एका प्रतिनिधी करवी जिल्हाधिकारी यांचे सोबत आपली आपबिती कथन करून जास्तीत जास्त मदतीचा ओघ कसा निर्माण करता येईल यासाठी मी स्वतः प्रत्यक्षात हजर राहून तातडीची बैठक उद्या बोलविण्यात आली असल्याने पिडीत शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधींनी यवतमाळ येण्याच्या सूचना केल्या.
परिणामी , पूरग्रस्तांना तात्काळ मदत प्राप्त व्हावी यासाठी आपण ठोस उपाययोजना करून लवकरच अन्न धान्याचे वाटप करणार असल्याची माहिती यावेळी खा.धानोरकर यांनी दिली.याप्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार , अरुणाताई खंडाळकर , तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार , आशिष कुळसंगे , वसंतराव आसुटकर , पालाश बोढे ,रवींद्र धानोरकर , नंदेश्वर आसुटकर , अंकुश माफुर यांचे सह पिडीत शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट दापोरा बांधावर येऊन पुरस्थितीचे वास्तव मागील पंधरा दिवसांपूर्वीच्या भेटीत पाहिले.तशा आशयाची मागणीही सरकार कडे करण्यात आली. दरम्यान खा.बाळू धानोरकर यांचाही पूरग्रस्त भागाचा दौरा औटघटकेचा तर ठरणार नाही ना ? किंबहुना पिडीत शेतकरी मदतीसाठी आवासून प्रतीक्षेत असल्याने तातडीने मदतीचा हात पदरी पडावा या बहुप्रतिक्षेत येथील नुकसानग्रस्त शेतकरी आहे.