नागपंचमी विशेष...
सर्पप्रेमाने झपाटलेला मारेगावचा तरुण पिंटू उर्फ प्रकाश वरारकर..!
🔸सापाचे रक्षण करण्याचा उचलतोय विडा
🔸शेकडो सापांना दिले आजतागायत जीवदान
'साप' दिसला की अनेकांच्या मनात भितीदायक थरकाप सुटतो. किंबहुना सापाच्या भितीने चावा , मृत्यू असे आकालणीय मनात घर करून कमालीची गारद होणारी मानवी जात सापाबाबत भितीदायक गैरसमज मनात आठवतोय.मात्र यास अपवाद ठरतो आहे मारेगावचा तरुण सर्पमित्र पिंटू वरारकर.
घरात ,शेतात अथवा रस्त्याने साप दिसताच अनेकांच्या मनात धडकी बसते.अशावेळेस सापाला मारण्यासाठी अनेकांचे हात सरसावतात.मात्र अचानक कुणालाही त्रास न देणाऱ्या सापाचे रक्षण करण्याचा विडा मारेगावतील सर्परक्षक पिंटू वरारकर याने गत पाच वर्षांपासून उचलला आहे.आजतागायत शेकडो सापांना जीवनदान दिले आहे.
स्वतःचे अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणाऱ्या सापाबाबत भिती व अंधश्रद्धामुळे अनेक सापांना मारले जातात.पर्यावरणाचा महत्वाचा घटक असलेला सापाला मारून कळत नकळत पर्यावरण संतुलनाचा एक प्रकारे ऱ्हास होतांना दिसते आहे.
मारेगाव तालुक्यात हा ऱ्हास थांबविण्यासाठी पिंटू वरारकर नित्याने प्रयत्नशील असतो. सरपटत येणारा मृत्यू असा गैरसमज असतांना हाच साप एखादा सर्पमित्र पकडतो तेव्हा आश्चर्य वाटतेय.मात्र अशा अद्भुत जगतात सर्प प्रेमाने हा तरुण पुरता झपाटला आहे.
जिवंत साप पकडण्याचा प्रवास सुरु करण्यापूर्वी पिंटू याने पुणे येथील मिटकॉंन संस्थेत साडेतीन महिने अभ्यास अन सराव केला.तेव्हापासून शेकडो साप जिवंत पकडून जीवनदान दिले.मारेगाव शहरासह ग्रामीण भागात साप दिसताच त्याच्याकडे फोन खणखणतोय.यत्किंचितही वेळ न दवडता रात्री बेरात्री , उन्ह असो वा पाऊस निःस्वार्थपने त्या ठिकाणी पोहचत सापाला जिवंत पकडून वनविभागास संपर्क करीत जंगलात सोडून देतो.
महाराष्ट्रात आढळते १०८ जातीचे साप
विविध जातीचे १०८ साप प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते मात्र यात मन्यार , कोब्रा ,घोणस , पूरसे नामक जातीचे साप हे जहाल विषारी असतात.बिनविषारीत धामण , तस्कर , मांजऱ्या , कवड्या आदी सापाची गणना होते मात्र चार जहाल विषारी सापाने दंश केल्यास विहीत वेळेत उपचार न झाल्यास मृत्यू जवळ येऊ शकतो.
सर्पमित्रालाच झाला होता सर्पदंश
साप नेमक्या कोणत्या जातीचा आहे.तो स्टिक च्या साहाय्याने कसा पकडायचा याचा पूर्ण अभ्यास व कल्पना असतांना मारेगाव येथे गेल्या एक वर्षांपूर्वी एका घरातील कोब्रा जातीच्या जहाल सापाने खुद्द सर्पमित्र पिंटू वरारकर हे साप पकडतांना हाताच्या बोटाला दंश केला.तात्काळ मारेगाव रुग्णालयात दाखल केले मात्र मुबलक सोय नसल्याने त्याला वणी खासगी रुग्णालयात दाखल केले.तब्बल एक लाख रुपये उपचारादरम्यान स्वखर्च करून शेकडो सापाला जीवदान देणाऱ्या पिंटूला जीवनदान मिळाले.मात्र त्याचा जिवंत साप पकडून सुरक्षित स्थळी सोडण्याचा ध्यास आजही कायम आहे हे येथे उल्लेखनीय !
दरम्यान , मारेगाव तालुक्यातील आजपर्यंत ४० ते ५० गावातील शेकडो सापांना जीवनदान देऊन त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करतोय.असा हा पिंटू वरारकर मारेगाव तालुक्यात उत्सुकतेचा विषय नेहमीच चर्चेचा ठरतो आहे.नैसर्गिक चक्र सुरळीत चालविण्यासाठी सापाचे रक्षण करणे हे माझे सामाजिक दायित्व समजतो अशा भावना पिंटू उर्फ प्रकाश मारोतराव वरारकर याने विदर्भ सर्च न्यूज शी बोलतांना व्यक्त केल्या.