दुर्देवी घटना...
तलावात बुडून युवकाचा मृत्यु
🔸रामपूर (कुंभा) येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रामपूर येथील युवक मासे पकडण्यासाठी गेले असता एका युवकाचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला दुपारी ३ वाजताचे दरम्यान घडली.बापूजी भाऊराव आत्राम (२५) असे तलावात करून अंत झालेल्या युवकाचे नाव आहे.या घटनेने रामपूर , कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामपूर येथील गावालगत तलाव असून येथील अमोल टेकाम, अतुल मेश्राम व बापूजी आत्राम हे तिघे मित्र मासे पकडण्यासाठी तलावात शिरले.तलावात जाळे टाकल्यानंतर बाहेर निघण्याच्या नादात दोघे सुखरूप निघाले.मात्र बापूजी हा अचानक तलावात बुडाला व यातच त्याचा करून अंत झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या बापूजीच्या दुर्देवी अंताने रामपूर येथे शोककळा पसरली आहे.दरम्यान बुडालेल्या बापूजीचा मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही.तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने शोध कार्यास अडसर निर्माण होत आहे.पोलीस प्रशासनास याबाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील कार्यवाही साठी यंत्रणा हलविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.