धक्कादायक...
नागरिक आले पाहून... आकापूर पूल गेला वाहून..!
🔸रस्तेही झाले जमीनदोस्त
🔸पुलाचे व रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
तालुक्यातील चिंचाळा ते आकापूर रस्ता सततच्या पावसाने पुर्णतः उखडून गेला असून हा रस्ता जमीनदोस्त झाला आहे.या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याचे वास्तव असतांना रस्त्यासह पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते अंकुश माफुर यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन वरिष्ठांना देण्यात आले आहे.
चिंचाळा ते आकापूर रस्त्याची मागील काही वर्षांपासून पुर्णतः वाट लागली आहे. अशातच सततच्या पावसाने हा रस्ता जमीनदोस्त झाला आहे.आकापूर गावालगत असलेला पूल पाण्याने पुर्णपणे वाहून गेल्याने प्रशासनावरच आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
दरम्यान सदर रस्त्याने येजा करणे दुरापास्त झाले आहे.विशेष म्हणजे या रस्त्याने अनेक ग्राम खेडे असतांना शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे.विद्यार्थ्यांकरिता असलेली महामंडळ बसही बंद झाली आहे.त्यामुळेच शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे तात्काळ पुलाचे बांधकाम करून रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अंकुश माफुर यांच्या नेतृत्वात नितिन खंडाळकर , हरिष परचाके , चेतन वाघाडे , संजय वानखेडे , संतोष , कुणाल सालवटकर , यांचेसह येथील नागरिक प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी दिला आहे.