खळबळजनक...
गर्भवती महिला तीन तास वेदनेने विव्हळत.. उपचारविना ठेवले ताटकळत..!
🔸ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा प्रताप
🔸कर्तव्य कसुराचा सर्वत्र संताप
🔸ग्रामीण रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर
🔸पतीची वरिष्ठांकडे तक्रार
मारेगाव : प्रतिनिधी
सर्वसामान्य रुग्णाचे उपचार केंद्र म्हणून मारेगाव ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते.किंबहुना उपचाराकरिता दाखल केले जाते मात्र येथील मुजोर कर्मचाऱ्यांनी अडेलतट्टू धोरण अवलंबित चक्क गरोदर महिलेस उपचाराविना तब्बल तीन तास ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार दि.१० जुलै रोजी घडल्याने पतीने कर्तव्यात कसूर करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची तक्रार थेट वरिष्ठांकडे केली आहे.उपचाराविना हतबल झालेल्या महिलेस पतीने अखेर खासगी वाहनाने यवतमाळ येथे हलविले अन सुखरूप प्रसूती झाली असली तरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बेताल वागणुकीचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मारेगाव येथील प्रफुल्ल सदाशिव आदे यांच्या गरोदर पत्नीचे पोट दुखू लागल्याने त्यांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती करिता दाखल केले.मात्र येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिचारिकेने तपासण्याचे सौजन्यही दाखविले नसल्याचा आरोप गर्भवती महिलेच्या पतीने केला आहे.
दरम्यान , वेदनेने विव्हळत असलेल्या गरोदर महिला तब्बल तीन तास असह्य वेदना सहन करीत असतांना येथील डॉक्टर व परिचारिका मात्र तिच्यावर उपचार करण्यास मज्जाव केला.केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचाही पतीने आरोप केला आहे. या गंभीर प्रकाराने कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर टांगले जात आहे.
तब्बल तीन तास विव्हळत असलेल्या गरोदर महिले बाबत ग्रामीण रुग्णालयातील प्रशासन किती सजग आहे याची प्रचिती संतापाची लाट उसळवीत आहे. रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका कर्मचारी उपचार करीत नसल्याने अखेर पतीने खासगी वाहनाने यवतमाळ येथे हलविले.यवतमाळ येथे गरोदर मातेने सुदैवाने एक गोंडस बाळाला सुखरूप जन्म दिला.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या व गरोदर महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित डॉक्टर व परिचारिकेच्या बेताल वागणुकीची तक्रार पती प्रफुल्ल आदे यांनी वरिष्ठांकडे केली आहे.सदरील गंभीर वागणुकीची कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्तव्य बजावतांना असा वेदनादायी प्रकार प्रशासनात होत नाही.कर्तव्यात नेहमीच अग्रेसर व संवेदनशील असणाऱ्या कर्मचाऱ्यांची रुग्णाप्रती प्रामुख्याने उपचाराकरिता सहानुभूती कायम असते.याबाबत तक्रार झाली आहे तर मला यापुढे प्रशासनात कडकपणा राबविता येईल.डॉ.प्रिया वानखेडेवैद्यकीय अधीक्षकग्रामीण रुग्णालय , मारेगाव