शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देवून प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
🔸मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
🔸तहसीलदार यांना निवेदन
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात सातत्याने येत असलेल्या पावसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले अशातच बेंबला प्रकल्प कालवा उभारणीत निकृष्ठ दर्जा चे बांधकाम करण्यात आले त्यामुळे कालवे फुटून शेकडो हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाल्याने दोषींवर कारवाई करून तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार दीपक पुंडे यांना देण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील कुंभा व मार्डी विभागात बेंबळा प्रकल्पाच्या कामात निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याने अनेक कालवे फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा प्रवाह जाऊन तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. अशातच संपूर्ण पिके पाण्याखाली जाऊन शेत जमीन खरडून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.यास पूर्णपणे बेंबळा प्रकल्प अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान , झालेल्या अतिवृष्टीमूळे अनेकांच्या शेताचे होत्याचे नव्हते झाले.प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत सर्वेक्षण सुरू करावे व नुकसानग्रस्त शेतकरी यांना अनुदान द्यावे अशा आशयाची मागणी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आली आहे.तहसीलदार दीपक पुंडे यांना दिलेल्या निवेदन वेळी माजी जी.प.सदस्या अरुणा खंडाळकर , बाजार समिती उपसभापती वसंतराव आसुटकर , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , मुन्ना कुरेशी , गजानन किन्हेकर यांचे सह बहुसंख्य पदाधिकारी सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.