विदारक वास्तव...
बिहाडीपोड येथील शाळा शिक्षक नेमणूक असतांनाही आज अघोषित बंद
🔸शिक्षक व प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह
🔸पालकांची गटशिक्षण अधिकारी यांचेकडे तक्रार
मारेगाव तालुक्यातील बिहाडीपोड जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नेमणूक असूनही आज दि.२९ जुलै रोजी शिक्षकाने धावती भेट देत शाळा बंद करून विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालकात संतापाची लाट उसळत आहे.दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवणाऱ्या गंभीर बाबीची तक्रार पालकांनी केली आहे.
मारेगाव तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी बहुल गाव असलेले बिहाडी पोड येथे एक ते पाच वर्ग असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून जवळपास २२ विद्यार्थ्यांना दोन शिक्षक ज्ञानार्जन करतात. मात्र काही दिवसांपूर्वी यातील विष्णू टेकाम नामक शिक्षकास नवरगाव येथे अतिरिक्त शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली तर एकमेव असलेले शिक्षक शंकर सोयाम यांनी आज शुक्रवारला शाळेत येऊन विद्यार्थ्यांना सुट्टी देत चक्क शाळा बंद करीत रवाना झाले.त्यामुळे दिवसभर शाळा अघोषित बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार पालकांच्या लक्षात येताच थेट तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान , देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान होण्याचा बहुमान मिळाला खरा.मात्र मारेगाव तालुक्यातील आदिवासी भागात विद्यार्थ्यांना साधा शिक्षणाचा हक्कच हिरावल्या जात असतांना विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करण्याच्या प्रकाराने शिक्षकासह प्रशासनाच्याच कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.परिणामी नागरिकांनी दिलेल्या तक्रारीची नेमकी कोणती दखल घेतल्या जाते याकडे पालकांचे लक्ष लागले असून पारदर्शक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच लता टेकाम , ग्रा. पं. सदस्य भास्कर टेकाम , भीमराव आत्राम , दादाराव आत्राम , क्रांतिवीर शामदादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम , हरिभाऊ आत्राम , प्रभाकर टेकाम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप घाटे , सुभाष टेकाम , अय्या आत्राम आदींनी दिला आहे.