अतिवृष्ठी भागाचा दौरा...
अजित पवार पोहचले दापोऱ्याच्या बांधावर...!
🔸चक्रव्यूव्हात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून
🔸विदारक स्थिती विधानसभेत मांडण्याचे सूतोवाच
मारेगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या पुरग्रस्त ,अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर प्रामुख्याने विदर्भात आहे. त्यांनी आज दि.२९ जुलै रोजी मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे आढावा घेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.ही विदारक परिस्थिती विधानसभेत मांडून तात्काळ मदतीसाठी आग्रही भूमिका विषद करण्याचे सूतोवाच केले.
मारेगाव तालुक्यातील दापोरा , चिंचमंडळ व परिसरातील शेकडो हेक्टर शेतकऱ्यांना पूर व अतिवृष्ठीचा जबर फटका बसला आहे.शेतकऱ्यांची तूर , कपाशी व सोयाबीन पाण्याखाली गेली तर शेत जमिनी खरडून गेल्याने कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याची पुरती वाताहत होऊन आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे.आगामी काळात होणारी उत्पादनातील घट शेतकऱ्यांची विवंचना व चिंता वाढवत असल्याचे भयाण वास्तव आहे.
दरम्यान , विरोधी पक्षनेते अजित पवार हे मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे सायंकाळी ४.१५ वाजता दाखल झाले. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची जड अंतःकरणाने आपबिती कथन केली. अनेकांच्या तक्रारी , निवेदनाचा खच त्यांचेसमोर पडला .शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील छटा वेदनेला वाट मोकळी करून देत साहेब , आमच्या नुकसानीचा पाढा शासन दरबारी पोहचवून मदतीची आर्त हाक यावेळी शेतकऱ्यांनी दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परिसरातील वेदनादायी वास्तव पाहत शेतकऱ्यांशी संवाद साधला.झालेले नुकसान अतिशय भयाण असतांना ही विदारक परिस्थिती मी स्वतः विधानसभेत मांडून तात्काळ मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूतोवाच केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.पवार यांचा झंझावाती दौरा मारेगाव तालुक्यातील पिडीत शेतकऱ्यांचे अश्रू डोळ्यात साठवून विरोधी पक्ष नेत्याचा ताफा सेलू ता.वणी कडे कूच केला.