वणी उपविभागातील तीन तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा
🔸खरीपाचे पीक कर्ज माफ करून रब्बी पिकांकरिता कर्ज उपलब्ध करून द्या
🔸राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाधिकारी यांचेकडे साकडे
मारेगाव : प्रतिनिधी
सलग पाऊस , वर्धा नदीचा पूर व बेंबळा प्रकल्पाने सोडलेल्या पाण्याने वणी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वणी उपविभागाला ओला दुष्काळ जाहीर करण्याचा आर्त टाहो राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिहाधिकारी यांचेकडे फोडला आहे.
मागील पंधरा वीस दिवसापासून सातत्याने पावसाने कहर करीत उभे पिके उध्वस्त केली.हजारो हेक्टर शेतजमिनीत पाणी साचून पिकांची अवस्था धुळीस मिळविली.अनेक शेतजमिनी खरडून गेल्या असून वणी विधानसभा क्षेत्रातील वणी , मारेगाव , झरीजांमनी तालुके प्रभावित झाले आहे.त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांची स्थिती लयास गेली आहे.
तीनही तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदतीचा तात्काळ ओघ वाढवावा.खरीपाचे पीक कर्ज माफ करावे , रब्बी पिकांकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा करावे.यासोबत पशुधनास वैरणाची तात्काळ व्यवस्था करावी आदी मागण्यांचे निवेदन मारेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे सह शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले आहे.
दरम्यान , नैसर्गिक संकटासह बेंबळा प्रकल्पाच्या बेजबाबदार कामाने पुरता मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून दिलासा द्यावा अशी आर्जव मागणीही सचिन पचारे यांनी केली आहे.