संवेदना...
बोटोणी येथील अंगणवाडी सेविका जोत्स्ना राऊत यांचेवर काळाची झडप
🔸सावंगी मेघे रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
🔸मातृ- पितृ छत्र हरविल्याने कोवळी बालके झाले पोरके
🔸बोटोणी परिसरात हळहळ
मारेगाव एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बोटोणी ( लाईन पोड ) येथील अंगणवाडी सेविका जोत्ना विठ्ठल राऊत (३५) यांचे आज पहाटे चार वाजताचे दरम्यान गंभीर आजाराने निधन झाले.जोत्स्ना यांच्या निधनाने बोटोणी परिसरात व एकात्मिक बाल विकास प्रकल्प वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका या लाईन पोड येथील चिमुकल्यांना बाळकडूचे धडे गिरवत असतांना मागील काही दिवसांपूर्वी पासून एका गंभीर आजाराने त्यांना कवेत घेतले.विविधांगी स्थळी उपचार सुरू असतांना आज दि.२७ जुलै रोजी पहाटे चार वाजताचे सुमारास त्यांनी सावंगी मेघे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान त्यांच्या यजमानांचे गतवर्षाला दीर्घ आजाराने निधन झाले.आपल्या कर्तव्यात पारदर्शकता व कोवळ्या दोन लेकरांची जबाबदारी पेलत जीवन कंठणाऱ्या जोत्स्ना यांचेवर अवघ्या दिवसात नियतीने डाव साधत काळाने झडप घातली. या वेदनादायी घटनेने १२ वर्षीय आरोशी व ९ वर्षीय निर्भय हे त्यांची कोवळी मुले पितृ मातृ छत्र हरविल्याने पोरकी झाले आहे. जोत्स्ना राऊत यांचेवर माहेरी धोतरा ता.हिंगणघाट जी.वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान , जोत्स्ना राऊत यांच्या निधनाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प वर्तुळात व बोटोणी परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.