बेंबळा प्रकल्प बसतोय शेतकऱ्यांच्या मानगुटीवर..?
🔸प्रकल्पाचे डझनभर दरवाजे उघडले
🔸शेकडो शेतजमिनी प्रभावित
🔸अनेक गावे पाण्या जवळ
मारेगाव : दीपक डोहणे
वरुणराजा सह बेंबळा प्रशासन शेतकऱ्यावर कोपला असल्याचे विदारक चित्र मारेगाव तालुक्यात आहे.प्रकल्पाचे दरवाजे उघडली असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला.त्यामुळे शेकडो हेक्टर शेती प्रभावित झाली आहे.चिंतेत भर टाकणाऱ्या प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळत आहे.अनेक ठिकाणचे प्रामुख्याने वर्धा नदी जवळील गावाला संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
मारेगाव तालुक्यातील सर्वत्र पावसाने गत पंधरा दिवसापासून हाहाकार माजविला आहे.शेकडो हेक्टर शेतजमिनी पाण्यात आहे.पावसाने उसंत न दिल्याने कपाशी व सोयाबीन पिकावर कचऱ्याने डोके वर काढले आहे.बेंबळा प्रकल्पाचे थातुरमातुर कामेही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले.डझनभर कालवे फुटून शेतात पाणी शिरले त्यामुळे बहुतांश शेतजमिनी खरडून गेल्याचे भयाण वास्तव आहे.
आज सोमवारला नदी नाले ओसंडून वाहत आहे.प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने पाण्याचा प्रवाह वाढला असतांना दापोरा पुलही पाण्याखाली गेला आहे.पाण्याने मुसंडी मारत शेकडो हेक्टरवरील शेतात पाण्याने कूच करीत शेतात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.उभे पीक पाण्याखाली आल्याने बळीराजा पुरता आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.शिवणी , गोरज , आपटी , दांडगाव गावानजीक असलेल्या वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरून पाणी गावाशेजारी आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते.कृषी प्रधान देशाचा पोशिंदा आधीच आर्थिक विवंचनेत असतांना कर्जाच्या गर्तेत जाऊन कशीबशी व्यवस्था करीत कपाशी व सोयाबीन पिके डोलाने उभी केली मात्र अती पावसाने ह्याच पिकांना आता कचऱ्याने वेढा घातला आहे.अस्मानी सुलतानी संकटाचा मारा सहन करीत बळीराजाच्या पदरी नैराश्य कायम आहे.वाढत्या पाण्याने शेतकऱ्यांसमोर मोठे उभे संकट ठाकले असतांना शेतकरी चक्रव्यूहात सापडला आहे.मायबाप सरकार केव्हा व कशी मदत देईल या भाबळ्या आशेकडे पिडीत शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहे.