मारेगाव-मार्डी रस्त्याने घेतला दुचाकीस्वारांना मणक्याच्या आजाराचा विळखा
🔸खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
मारेगाव-मार्डी या नऊ किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता जड वाहतुकीमुळे पूर्ण तुटला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.आता पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून राहात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. परिणामी अनेक दुचाकीस्वारांना मणक्याच्या आजाराने कवेत घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. यावर पांघरून घालण्यासाठी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील मारेगाव-मार्डी हा मार्ग अतिशय महत्वाचा मार्ग आहे.या मार्गावरून सतत वाहतूक सुरू असते.दररोज शाळा-महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येजा करतात. परंतु या मार्गावरून क्षमतेपेक्षा वजनदार वाहतूक झाल्याने गेल्या दोन वर्षात या नऊ किमी रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
आता हा रस्ता नावालाच उरला असून सर्वत्र खड्डे पडले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहे. तर सतत या मार्गाने येजा करणाऱ्याना कंबर व मान दुखीचे आजार जडले आहे.
त्यामुळे या मार्गावरून येजा करणाऱ्या३०ते ४०गावातील नागरिक हैराण झाले असून पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीचे काम होणे शक्य नसल्याने या मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात यावे जेणे करून अपघात कमी होतील अशी मागणी करण्यात येत आहे.