हटवांजरी पोडातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो
🔸नळयोजना कार्यान्वित होऊनही पाणी पुरवठ्याचे भिजत घोंगडे
🔸मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित
🔸️ग्रामस्थांनचे बीडीओ ला निवेदन
मारेगाव : प्रतिनिधी
शासकीय योजने पासून कोसो दूर असलेल्या हटवांजरी पोडातील नागरिक मूलभूत गरज असलेल्या पाण्यापासून वंचित आहे.मागील सात महिन्यापूर्वी नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र पाणी पुरवठ्याचे भिजत घोंगडे कायम आहे.तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा बीडीओ यांना दिलेल्या निवेदनातून येथील नागरिकांनी दिला आहे.
तालुक्यातील हटवांजरी येथील आदिवासी बहुल असलेल्या पोडावर मूलभूत गरजा अपूर्ण आहे.ऐन उन्हाळ्यात उन्हासह पाण्याचे चटके येथील नागरिकांना सहन करावे लागले.येथे नळ योजना अर्धवट कार्यान्वित करण्यात आली.मात्र पाणी पुरवठ्याचा अजूनही थांगपत्ता नाही.त्यामुळे येथील नागरिक पाण्यासह विविध मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहे.स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे.
दरम्यान पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी व नागरिकांची ससेहोलपट थांबवावी या प्रमुख मागणीसाठी येथील बीडीओ कल्हारे यांना दिलेल्या निवेदनातून प्रमोद मेश्राम , दीपक आत्राम , सुनील टेकाम , मीना मेश्राम , मंदा आत्राम , माया आत्राम , कविता टेकाम , संदिप आत्राम यांचे सह बहुतांश नागरिकांनी केली आहे.परिणामी हा गंभीर बनलेला प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.