अखेर त्यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
🔸️मारहाण प्रकरणी पत्नीने दिली होती पोलिसात तक्रार
🔸️अपमान जिव्हारी लागल्याने घेतले होते विष
🔸️टाकरखेडा येथील घटनेने खळबळ
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील टाकरखेडा येथील शेतकऱ्याने एकास उसनवारी म्हणून आर्थिक देवाण घेवाण केली.सदर रक्कम मागण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण केली.हा अपमान असह्य झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी विष प्राशन केले. यात दोषी असलेल्या चार जना विरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार केली. परिणामी विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याने वणी येथील रुग्णालयात दि.५ जून रोजी संध्याकाळी दहा वाजताचे दरम्यान अखेरचा श्वास घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
नानाजी धानकी (४५) असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांनी गावातील विलास धानकी यांना आठ महिन्यांपूर्वी ५० हजार रुपये उसनवारी स्वरूपात आर्थिक देवाण केली.ती परत मागण्याचे दृष्टीने दि.२२ मे रोजी विचारले असता विलास धानकी सह मयूर धानकी, चंद्रकला धानकी रा.टाकरखेडा व मारेगाव येथील विठ्ठल रांगणकर यांनी टाकरखेडा स्थित मारहाण केली.हा अपमान जिव्हारी लागल्याने नानाजी धानकी यांनी विष प्राशन केले.यास कारणीभूत असलेल्या चार जणांविरुद्ध पत्नी सुभद्रा नानाजी धानकी यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान , विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांस मारेगाव रुग्णालयात दाखल केले.प्रकृती अस्वस्थामुळे पुढील उपचारार्थ वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तब्बल पंधरा दिवस उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने नानाजी धानकी यांनी रविवारच्या संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.परिणामी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी चार जन रडारवर आहे.