मुलांना संघर्ष करायला शिकवा; पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे
मारेगाव :- प्रतिनिधी
जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत कधीच यशस्वी होणार नाही. त्यामुळे मुलांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्ष करायला शिकवा असे मत कोरपना चे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी कोरपना येथे स्टुडन्ट फोरम ग्रुप तर्फे आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नायब तहसिलदार पदाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गिरीश उर्फ प्रतीक गजाननराव बोरडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वैभव ठाकरे , वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय ठावरी, प्रतिकच्या मातोश्री कलावती बोरडे आदी मंचावर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गाने परीक्षेत यशस्वी ते बद्दल स्वागत मिरवणूक काढण्यात आली. पुढे बोलताना ते म्हणाले स्पर्धा परीक्षा या प्रशासकीय सेवेत स्थान मिळवण्याच्या संधी आहे. त्यासाठी जिद्द चिकाटी व कठीण परिश्रम घेण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तेव्हाच आपण यशस्वी व्हाल असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात आजच्या युगात स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याची महती समजून सांगितली. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी कुठलाही न्यूनगंड न ठेवता ध्येय निश्चित करून कठीण परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. प्रा. ठावरी व त्याच्या आई कलावती बोरडे यांनी प्रतीकची जडणघडण कशी झाली आणि त्याने हे यश कसे गाठले त्याबद्दल माहिती दिली. प्रतिक नी आपल्या भाषणात त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी काय कराव लागत याची पंचसूत्री सांगितली. याच सत्कार सोहळ्यात विविध सामाजिक संघटनानी सुद्धा प्रतिकचा सत्कार केला. त्याला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मालेकर, संचालन अविनाश महल्ले तर आभार दीपक पारखी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने युवक- युवती सह नागरिकाची उपस्थिती होती.