मारेगावात मिळणार अभ्यासिका व उद्यानाला आकार
🔸️७८ लाखांचा निधी मंजूर
🔸️नगरसेवक जितेंद्र नगराळे , शंकर मडावी यांच्या लगबगीची फलश्रुती
मारेगाव : दीपक डोहणे
पाठांतर ,मनन , एकाग्रता , चिंतन , उजळणी ही अभ्यासतंत्रे आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना आकार देण्यासाठी आणि अभ्यासाची कौशल्ये अंगिकारून स्वतःला घडविण्यासाठी मारेगावात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाचे निर्माण होणार आहे.नगरसेवक जितेंद्र नगराळे यांच्या प्रयत्नाने प्रभाग सतरा मध्ये नियोजित अभ्यासिका व उद्यान आकार घेणार आहे.
प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मागील अनेक वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याच्या हालचालीला कमालीचा वेग आला होता.मात्र काही संकुचीत विचारसरणीने केवळ नावाला विरोधाभास करीत आपल्या वैचारिक प्रगल्भतेची थुटकारी ओळख निर्माण केली होती.दरम्यान नगरसेवक जितेंद्र नगराळे यांनी पुढाकार घेत शंकर मडावी यांच्या सहकार्याने भवनाचा तोडगा काढीत येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारण्यावर शिक्कामोर्तब केले.
प्रभाग सतरा मधील लेआऊट च्या खुल्या जागेवर नगरसेवक जितेंद्र नगराळे यांच्या अथक प्रयत्नाने व शंकरराव मडावी यांच्या सहकार्याने अनेक दिवसांपासून रेंगाळलेले नियोजन ग्रंथालय व उद्यान च्या रुपात अमलात येणार आहे. १३ हजार ओपन स्पेस च्या स्क्वेअर फुटावर समाजकल्याण विभागा मार्फत ग्रंथालय करिता ४७ लाख तर उद्याना साठी ३१ लाख असा एकूण ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी दोन्ही थोर व्यक्तिमत्वाचे नाव देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनात एकमताने ठरावही मंजूर करण्यात आला.यापुढेही प्रभागनिहाय विकासासाठी निधी खेचून विकासावर भर देण्यासाठी मी कायम प्रयत्नशिल असेल असा आशावाद नगरसेवक जितेंद्र नगराळे यांनी विदर्भ सर्च न्यूज शी बोलतांना व्यक्त केला.
अलीकडील स्पर्धेच्या युगात अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याने श्रवण , वाचन , संभाषणे , स्पर्धा परीक्षेची तयारी , लेखन आदी अभ्यासाची कौशल्ये आत्मसात करून आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मारेगावात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सतरा मध्ये ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ( ग्रंथालय ) निर्माण करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.यासोबत बालकांसोबत प्रौढांचा विरंगुळा व्हावा या उदात्त हेतूने रयतेचे राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावारूपी उद्यानाची उभारणी होणार आहे.व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आणि सोबत विरंगुळाची नाळ बांधण्यासाठी नागरिकांना ही एक अनाहूत पर्वणी ठरणार आहे.