हत्या प्रकरणी आरोपींना चार दिवसाचा पी.सी.आर
🔸️सी.डी.आर.वरून पोलीस पोहचले आरोपींच्या घरापर्यंत
🔸️हत्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस पथक कार्यान्वित
🔸️पशुधन ठार करण्याच्या प्लॅनिंगला तिसऱ्या डोळ्याचा आधार ?
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील डोर्ली येथील हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेत वास्तव उजेडात आले.विशाल झाडे यांचा गत पंधरा वर्षांपासून वैरी बनलेल्या सतीश गौरकार यांचे पशुधन ठार करण्याचा बेत थेट फिर्यादीचा भाऊ विलास वर उलटल्यानंतर आणखी तीन जन गजाआड झाले.चारही आरोपींना वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना चार दिवसाची ( बुधवार पर्यंत ) पोलीस कोठडी सुनावली.त्यामुळे हत्येच्या मुळापर्यंत जाऊन अनेक धागेदोरे गवसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
डोर्ली या छोट्या गावात मृत विलास व फिर्यादी सतीश गौरकार यांचे घराशेजारी हत्येच्या दुसऱ्या दिवशी पासून गजाआड असलेला विशाल झाडे यांचे घर आहे.जागेच्या वादावरून मागील पंधरा वर्षांपासून एकमेकात वितुष्ठ आहे.या ना त्याकारणाने नेहमीच वादाची ठिणगी हा त्यांचा नित्याचा क्रम झाला होता.अशातच विशालच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना घर करू लागली.शेतात राबराब राबणाऱ्या आणि ज्यांच्या भरवशावर शेतीची मशागत आणि वर्षभर काम करवून घेतो त्या "सर्जा राजा" लाच विषारी औषधाने ठार मारण्याची सुबक कल्पनेचा अंमल करण्यासाठी मारेगाव येथील बिअर बार निवडले.
दि.८मे रोजी डोर्ली येथील विशाल झाडे सह नवरगाव ( धरण )येथील अजित फुलझेले , प्रशांत काटकर आणि रुपेश नैताम हे मारेगावात मदिरेचे डोस घेत संध्याकाळी इंजेक्शनच्या रुपात पशुधनास ठार मारण्यासाठीचा प्लॅनवर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार रात्री उशिरा नवरगाव येथील अजित, प्रशांत ,रुपेश हे शेतात असलेल्या गोठ्या जवळ पोहचले.समोरील प्लॅनिंग फत्ते करण्याचा बेत असतांना जागली असलेला विलास गौरकार गोठ्याजवळ येताच तीन अधिक एक यांच्यात झटापट झाली.यातील रुपेश याने विलासला खाली पाडून अंगावर बसला आणि अजित व प्रशांत यांनी दुपट्ट्याने विलासचा गळा आवळून त्यास ठार केले.गोठ्याजवळ झालेली हत्या तब्बल दोनशे ते तीनशे फुटापर्यंत विलासचा मृतदेह नेऊन ठेवला.मात्र घटनास्थळी विलासचा मोबाईल घटनेच्या सकाळी पोलीसांनी हस्तगत केला.
मृतकाच्या भावाने विशाल झाडे यांचे विरोधात तक्रार दाखल करताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलीस तपासाअंती आजतागायत १५ जणांचे बयान नोंदविण्यात आले.
परिणामी , विशाल झाडे यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सिडीआर)लोकेशन वरून शनिवारला रात्री मुख्य आरोपींचा नावावर व शोधावर पोलिसांचा शिक्कामोर्तब झाला. रविवारच्या मध्यरात्री पासून त्यांच्या घरातून आरोपींची धरपकड झाली आणि तिघांना बेड्या ठोकल्या.घटनेची गंभीरता बघून पोलिसांनी तिसऱ्या डोळ्यांचाही दोन बिअरबारचा आधार घेतला.हत्येच्या मुळापर्यंत जाऊन विविधांगी बाबींचा उलगडा करण्यासाठी पोलीस पथक प्रयत्नशील आहे.