चिंचमंडळ येथून अवैध रेतीचा उपसा
🔸️वाळू तस्करांनी काढले डोके वर
🔸️वारेमाप उलाढालीत लाखोंचा महसूलला चुना
मारेगाव : दीपक डोहणे
वर्धा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचमंडळ येथील वाळू तस्करांनी पुन्हा डोके वर काढीत वारेमाप वाळूची तस्करी जोमाने चालविली आहे.दिवसरात्र होणाऱ्या तस्करीवर कारवाई व लगाम लावण्यास प्रशासनास सपशेल अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिंचमंडळ परिसर वाळू तस्करीसाठी मागील काहीवर्षापासून चांगलाच चर्चेत आहे.येथील तस्कर दिवसरात्र विना नंबरचे ट्रॅक्टर वाहन चालवित वाळूची तस्करी नवीन नाही.वर्धा नदी च्या परिसरात नव्यानेच घाट तयार करीत शासनाच्या महसूलला चांगलाच चुना लावण्याचे षडयंत्र आखले आहे.आपले सवंगडी मुख्य मार्गावर वॉच करण्यासाठी ठेवत हा गोरखधंदा चालविला जात आहे.
ही बाब सर्वश्रुत असतांना प्रशासनाच्या तकलादू धोरणाचा परिपाक म्हणून तस्करांचे चांगलेच फावत आहे.परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी येथील तस्करांनी कुणाला घुमजाव तर कुणाला ' लक्ष्मी चा प्रसाद ' देत आपले ईप्सित साध्य करीत असल्याचा आरोप होत आहे.
किमान दहा ते पंधरा टोळक्यांच्या तस्करांनी अवैध वाळू तस्करीच्या घाट आणि धुमाकूळ घातला आहे.रात्री दहा वाजताच्या पुढे गावातून वाळू नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या आवाजाने येथील नागरिक कमालीचे वैतागले आहे.मुख्य रेती घाट बंद असतांना तस्करांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोगदे तयार करीत वाळूची तस्करी चालविली आहे.हे तस्कर वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत असल्याने राजकीय वरदहस्ताने वाळू तस्करी खुलेआम सुरु आहे.वणी - मारेगाव ते यवतमाळ प्रशासनाच्या आलबेलपणाने व जाणीवपुर्वक दुर्लक्षाने वाळूतस्करीने महसूलला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे उद्या (सोमवार ) ला काही नागरिक थेट भेट घेणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.