वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा
शेतकरी दोन वर्षांपासून वीज जोडणीपासून वंचिततहसीलदार यांना निवेदन सादर
दिग्रस:- प्रतिनिधी
दिग्रस तालुक्यातील वाईमेंढी येथील शेतकरी संतोष गुंडाजी इंगोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून वीज जोडणीसाठी अर्ज केले होते. एका वर्षाच्या कालावधी नंतर फेब्रुवारी २०२० मध्ये कोटेशन काढले. १३ फेब्रुवारी २०२० मध्ये रोजी ६१०७ रुपये भरणा केला. आता दोन वर्षे उलटली मात्र अद्यापही कोणतेही विद्युत महामंडळाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विद्युत जोडणी केलेली नाही. यापूर्वी २०१८ मध्ये सुद्धा दोन वेळा शेतकरी इंगोले यांनी वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केले होते मात्र ते अर्ज विद्युत महामंडळ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून २ वर्षा नंतर हलगर्जीपणामुळे कागदपत्रे हरविले असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. त्यामुळे दिग्रसच्या अधिकाऱ्यांमुळे २ वर्ष अगोदरच आणि नंतर २ असे ४ वर्षे विलंब केला. या शेतकऱ्यामाणेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विजजोडण्या ताटकळत आहेत. सध्या शेतात पीक उभे असून विद्युत जोडणी नसल्याने डिझल इंजिनद्वारे शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. शेतात विहीर खोदली तेव्हापासून आता ४ वर्षे झालीत इंजिनद्वारे पाणी द्यावे लागते. डिझलचे भाव वाढले आहेत. दिवसभरातून १० लिटर डिझल लागते. अगोदर शेतकरी अवकाळी पाऊस तसेच निसर्गाच्या विविध आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडले आहोत. शेतात सध्या गहू उभा असून वेळेवर पाणी नसल्याने गहू जळत असल्याचे निवेदन तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्फत मुख्य अभियंता, अमरावती परिमंडळ यांना आज दि.३ मार्च २०२२ रोजी दिले.
आर्थिक व्यवहार करून मागील अर्ज निकाली काढल्याचे शेतकऱ्याने निवेदनातून आरोप केला आहे. विद्युत जोडणीसाठी अर्ज करणाऱ्यांना दिग्रस विद्युत विभागाने खांब उभे करून विद्युत जोडणी करून दिली. मला मात्र हेतुपुरस्सर डावलण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांना आपण याबाबत विचारणा करून शेतकरी व गरजू शेतकऱ्यांची विद्युत जोडणी करून द्यावी अशी मागणी निवेदनातून संतोष गुंडाजी इंगोले, रा.वाईमेंढी याने केली आहे.