12 गावातील 24 मुले ठरली स्टुडंट ऑफ द इयर! कोरोनातही केला अभ्यास!
आरंभी केंद्रातील उपक्रम जिल्हास्तरावर नेणार- प्रमोद सूर्यवंशी
दिग्रस :-प्रतिनिधी
मेट्रो सिटीतील कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये युवकांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार दिल्या जातो. मात्र गेली पाच वर्षे केंद्र प्रमुख किरण बारशे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील चिमुकल्या मित्रांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार देऊन प्रोत्साहित करीत आहेत. दरवर्षी प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पैकी एक पुरस्कार मुलीसाठी राखीव असतो. यावर्षीचा स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच आरंभी येथे पार पडला.
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभालाही लाजवेल अशा 'शाही' शिक्षण परिषदेत 24 विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिग्रस पंचायत समितीच्या सभापती अनिता दिवाकर राठोड अध्यक्षस्थानी तर शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यावेळी 'खास' उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य डॉ. रुख्मिणी उकंडे, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, केंद्रप्रमुख हेमंत दळवी, दिवाकर राठोड, डॉ. विष्णू उकंडे, सरपंच दुर्गा तडसे, उपसरपंच रमेश राठोड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिपक देशपांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष सुनिल राठोड यांनी मुलांच्या या कौतुक सोहळ्याला हजेरी लावली. मोठ्या पाहुण्यांच्या हस्ते चिमुकल्या मुलांचा हा गौरव त्यांच्या आईवडिलांनाही अनुभवता आला. पदक आणि प्रमाणपत्र असं या सन्मानाचं स्वरूप होतं. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक आयोजक केंद्रप्रमुख किरण बारशे यांनी तर संचलन आमीन चौहान यांनी केले. मुख्याध्यापक नरेंद्र थोरात यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरंभी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.