ग्रामीण भागातील मुलांना विमानवारी, दिल्ली दर्शनाची संधी!
🔸75 हजार मुलांचा सहभाग, टॉप 24 ठरणार अंतिम विजेते!
दिग्रस : - प्रतिनिधी
महादीप उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 24 विद्यार्थ्यांना दिल्ली दर्शन आणि विमानवारीची संधी मिळणार आहे. बाल वयातच स्पर्धा परीक्षेचं बाळकडू महादीप उपक्रमातून ग्रामीण मुलांना दिलं जातंय. यात 75 हजार विद्यार्थी सहभागी झाले असून विविध फेऱ्यांमधून सर्वाधिक गुण घेणारे टॉप 24 दिल्ली दर्शन आणि विमान वारीचे मानकरी ठरतील. परीक्षेच्या माध्यमातून प्रज्ञावंत मुलांची निवड करून त्यांचा आगळावेगळा गौरव करण्याचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे, हे इथे उल्लेखनीय!
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. प्रमोद सूर्यवंशी दारव्हा येथे कार्यरत असतांना त्यांनी तीन वर्षे दीप, महादीप आणि सुपर महादीप उपक्रम राबविले होते. त्याच उपक्रमाचा विस्तार करीत संपूर्ण जिल्ह्यासाठी महादीप हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण सभापती श्रीधर मोहोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी या उपक्रमास मान्यता देऊन सेस फंडातून 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून 9 हजार महादीप पुस्तिका जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोचविली जाणार आहे. विजेत्या मुलांचा जिल्हास्तरावर गौरव, मुलांची विमान वारी आणि दिल्ली दर्शन घडविले जाणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या इतिहासात परीक्षेच्या माध्यमातून मुलांची निवड करून पहिल्यांदाच अशी संधी ग्रामीण भागातील मुलांना मिळत आहे. यूपीएससी, एमपीएससीची ही पूर्वतयारी असून मुलांमध्ये वाचन, अभ्यास व सरावाची सवय विकसित करून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना अधिकारी बनविण्याची ही पूर्वतयारी आहे. शाळास्तरावर पाच सराव परीक्षा घेण्यात आल्या असून त्यात जिल्ह्यातील 75 हजार मुले सहभागी झाली. त्यातून निवड झालेल्या मुलांची केंद्रस्तरावर 180 ठिकाणी परीक्षा घेण्यात आली. यातून निवडलेल्या साडेतीन हजार मुलांची सोमवार ता. 7 ला तालुकास्तरावरील पहिली फेरी उत्साहात संपन्न झाली. दुसरी फेरी सोमवार ता. 14 मार्चला आयोजित केली जाईल. 22 मार्चला अंतिम म्हणजेच जिल्हास्तरावरील फेरी पूर्ण होऊन त्यातून जिल्ह्यातील 20 मराठी आणि 4 उर्दू माध्यमाच्या मुलांची निवड होईल. हीच मुले दिल्लीला विमानाने जाऊन दिल्ली दर्शनाचा आनंद घेणार आहेत.
दिग्रस येथे आयोजित तालुकास्तर परीक्षेचे आयोजन दिनाबाई शाळेत करण्यात आले होते. यात तालुक्यातील 170 मुले सहभागी झाली होती. परीक्षेचे आयोजन गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी गट साधन केंद्रातील साधनव्यक्ती आणि फिरते शिक्षकांच्या सहकार्याने केले.