मनसे नगरसेवकाची मागील कामाबाबत आक्रमक भूमिका
🔸मागील कामे चौकशीच्या फेऱ्यात ?🔸अधिकाऱ्यांना धरले किशोर तिवारी यांनी धारेवर
मारेगाव :- दीपक डोहणे
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून उदयास आलेली मारेगाव नगरपंचायत विकासाच्या नावावर बहुचर्चित आहे.आपण दोघे भाऊ मिळून मिसळून खाऊ चा मारेगावकरांना प्रत्यय आल्याने मारेगाव प्रभाग १३ चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अनिल गेडाम प्रचंड आक्रमक होत सर्व कामाचा गोषवारा मागितला.यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत कानउघाडणी केली.विविध प्रश्नांवर आक्रमक होत नगरसेवकाच्या भूमिकेने कर्मचाऱ्यांचे ब्लडप्रेशर वाढत आहे.दरम्यान पूर्वीच्या कामाची चौकशी लावून धरल्याने येणाऱ्या दिवसात अनेक कर्मचाऱ्यांचे काऊनडाऊन सुरू झाले आहे.
नगरपंचायत प्रशासनात सोमवारला कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आढावा घेतला.यावेळी तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तिवारी यांनी शहरातील विविध प्रलंबीत प्रश्नांवर अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
दरम्यान , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अनिल गेडाम यांनी मागील पंचवार्षिक मध्ये झालेल्या बोथट व मिलिझुलीच्या विकास कामाची चौकशी करण्यासाठी आक्रमक होत मागणी केली.प्रशासनाकरवी मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा गर्भित ईशारा यावेळी गेडाम यांनी दिला.
परिणामी शहरातील वस्ती नसलेल्या ठिकाणी लाखो रुपयांचा सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता अकारण बांधण्यात आल्याचा आरोप करून जिथे आवश्यक असलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने यावर नियंत्रण ठेवणाऱ्या व भागीदारीत असलेल्या अभियंत्यांची चौकशी करून उचलबांगडी करण्याची मागणी यावेळी गेडाम यांनी केली. शहरातील घनकचरा कंत्राटची सखोल माहिती प्रतिपादित करून पारदर्शक चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी , स्मशानभूमी सौंदर्यीकरण कामात लाखोंचा भ्रष्टाचार करून जनतेला सोयीपासून अलिप्त ठेवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासह शहरातील काही प्रभागात अवैधरित्या मटका , दारू विक्रीवर अंकुश लावण्यात यावा आदी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.मनसे नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेने अनेक कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे निदर्शनास येत होते. नगरसेवकाच्या आक्रमक शैलीचा धागा पकडत किशोर तिवारी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कानउघाडणी केली. नगरपंचायत मधील मागील कामाची पारदर्शक चौकशी करावी , पाठराखण खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम यावेळी तिवारी यांनी दिला.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार दीपक पुंडे , ठाणेदार राजेश पुरी , तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे , वीज वितरण कंपनीचे अभियंता पाटील, प्रभारी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.