दिग्रसच्या शैक्षणिक साहित्य पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन!
पुस्तक व डिजीटल स्वरूपात निर्मिती,
क्लिक सरशी उपलब्ध होणार आवश्यक साहित्य
दिग्रस : - प्रतिनिधी
दिग्रस पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या निवडक शैक्षणिक साहित्य पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते नुकतेच विमोचन करण्यात आले. तिवसा येथे आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात हे विमोचन संपन्न झाले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डायटच्या प्राचार्य डॉ. रेखा महाजन, ... उपस्थित होते. अशी पुस्तिका तयार करणारी दिग्रस ही जिल्ह्यातील 'पहिली व एकमेव' पंचायत समिती ठरली आहे, हे विशेष!
जिल्हास्तर शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीत दिग्रस पंचायत समितीच्या दालनाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन शैक्षणिक साहित्याची पाहणी केली व सहभागी शिक्षकांशी संवादही साधला.
यावेळी त्यांना ही पुस्तिका भेट देण्यात आली.
जिल्ह्यात सध्या निपुण भारत अभियान जोरकसपणे राबविले जात आहे. कोरोना काळात मुलांचे शिक्षण योग्यप्रकारे होऊ शकले नाही. त्यामुळे वाचन आणि संख्या लेखन या मूलभूत साक्षरतेच्या बाबबीत देखील मुले मागे पडल्याचे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे. मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
मुलांचे शिक्षण अधिक रंजक पदधतीने व्हावे यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती शिक्षक करीत असतात. अनेक अमूर्त, कठीण, अपरिचित संकल्पना स्पष्ट करून सांगण्यासाठी ही शैक्षणिक साधने अत्यंत उपयोगी सिध्द झाली आहेत. शिक्षक आपल्या नाविण्यपूर्ण कल्पना वापरून अनेक साहित्य तयार करीत असतात. ही शैक्षणिक साधने ज्या शिक्षकाने तयार केली असेल त्या विशिष्ट शिक्षकापुरते, त्याच्या वर्गापुरते किंवा शाळेपुरतीच मर्यादित राहतात. शिक्षकांच्या या सृजनशील निर्मितीचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी ही पुस्तिका तयार केल्याचे या पुस्तिकेचे संकल्पक गटशिक्षणधिकारी मुकेश कोंडावार यांनी सांगितले. तालुक्यातील ३१ शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यकृतींचा समावेश या 'कलरफुल' पुस्तिकेत करण्यात आला आहे. यात भाषेच्या १४ व गणिताच्या १७ साहित्यांचा समावेश आहे. पुस्तिकेत शैक्षणिक साहित्य तयार करण्यास लागणारे साहित्य, ते तयार कृती, त्याचे उपयोग देण्यात आले आहेत. सोबत त्या साहित्याच्या चित्राचा समावेशही करण्यात आला आहे. शैक्षणिक साहित्य तयार करणाऱ्या शिक्षकाचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांकही पुस्तिकेत समाविष्ट केला आहे.
निवडक शैक्षणिक साहित्य पुस्तिकेची निर्मिती करण्यासाठी विस्तार अधिकारी शुभदा पाटील यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख किरण बारशे, हेमंत दळवी, गिरीश दुधे, शिक्षक आमीन चौहान व तंत्रस्नेही उमेश राठोड यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुस्तिकेचे स्वागत केले असून शिक्षण विभागाने या वेगळ्या प्रयोगाचे कौतुक केले आहे.
चौकट : 'अक्षरांचं झाड, शब्दांची डिश, पाणीपुरी, पिझ्झा अन अंकांची ट्विस्ट!'
असं आकर्षक व आगळंवेगळं शीर्षक असलेली ही पुस्तिका डिजीटल स्वरूपातही तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे 'फ्लिपबुक' शिक्षकांना आपल्या मोबाईलमध्ये संग्रही ठेवता येईल. त्यामुळे एका क्लिक सरशी ते केव्हाही, कुठेही सहज उपलब्ध होईल. फ्लिप बुकची पाने बोटाने पुढे मागे सरकत असल्याने वापरकर्त्याला पुस्तक वाचत असल्याचा फिल येतो. हे डिजीटल फ्लिपबुक वायरल करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाने ते पहावे अशी सूचना शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी केली आहे.