जिल्ह्यातील 410 विद्यार्थ्यांनी दिली महादीपची अंतीम परीक्षा!
'टॉप ट्वेंटीफोर' गाठणार विमानाने दिल्ली!
दिग्रस : प्रतिनिधी
महादीप उपक्रमाची जिल्हास्तरीय अंतिम फेरी नुकतीच पार पडली असून जिल्हाभरातील 410 विद्यार्थी परीक्षेस हजर होते. या परीक्षेतून प्रत्येक वर्गातील 'टॉप फाईव्ह' विद्यार्थी दिल्ली दौऱ्यासाठी निवडले जातील. सर्वाधिक गुण घेणारे टॉप 24 निवडण्याची ही अंतिम परीक्षा असून या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे दिल्लीचे विमान तिकीट फायनल होणार आहे, हे विशेष!
शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी प्रथम तो दारव्हा तालुकास्तरावर राबविला. तेथे या उपक्रमास मिळालेले यश पाहून तो या शैक्षणिक वर्षात संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला.
यवतमाळ स्थित अँग्लो हिंदी शाळेत मंगळवार दिनांक 22 मार्चला दुपारी 12 वाजता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 50 प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. पेपर झाल्यानंतर लगेच पेपर तपासण्यास सुरवात करण्यात आली असून सायंकाळ पर्यंत निकाल तयार होणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान 24 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. दिल्ली दौरा आणि विमान प्रवासाचे बक्षीस असल्याने जिल्हाभरातील मुलांमध्ये मोठी चुरस पहायला मिळाली. परीक्षा केंद्रावर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही मोठ्या संख्येत परीक्षा स्थळी उपस्थित होते. परीक्षा आटोपताच विद्यार्थ्यांना आहार वितरित करण्यात आला. शालेय पोषण आहार अधिक्षक वंदना नाईक यांनी ही व्यवस्था केली होती.
विशेष सत्कार व दिल्ली दौराही! :
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या 5 वी ते 8 व्या वर्गातील मुलांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यास प्रोत्साहित करणारा हा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला. शाळा, केंद्र, तालुकास्तरावर परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तर फेरीत सहभागी होता आले. आता यात यशस्वी झालेल्या मुलांचा विशेष सत्कार सोहळा जिल्हा परिषद आयोजित करणार आहे. शिवाय त्यांच्या वर्गशिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाईल.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे. पुढील शैक्षणिक सत्रात देखील हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 5 वी ते 8 वीच्या मुलांसाठी राबविण्याची सूचना या अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागास केली आहे.
"ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवणारा हा उपक्रम आहे. मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी तसेच अभ्यास व सरावाची सवय लावणारा हा उपक्रम असून त्यास जिल्हाभरतातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
प्रमोद सूर्यवंशी शिक्षणाधिकारी, यवतमाळ.