विमानवारीचे 36 मानकरी निश्चित, महादीप परीक्षेतून झाली निवड
▪️घाटंजी तालुक्याची झेप, तिवासाळा शाळेचे मोठे यशदिग्रस : शारिक शेख
संकटाला संधी मानून संघर्ष करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेल्या महादीप परीक्षेत बाजी मारत ३६ विद्यार्थ्यांनी दिल्ली भेटीसाठी विमानाचे तिकीट निश्चित करून घेतले.
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बाल वयातच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून वर्षभर महादीप उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर मंगळवारी जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी सर्वाधिक ११ विद्यार्थी एकट्या घाटंजी पंचायत समितीमधील आहेत. विशेष म्हणजे येथील तिवसाळा जिल्हा परिषद शाळेचे तब्बल सात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. येथील श्रवण अडकिने व मनीष मुनेश्वर या दोघांनी ५० पैकी ४९ गुण मिळवून जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमधून केंद्र, तालुका आणि जिल्हा पातळीवरील परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून ३६ विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. कळंब तालुक्यातील कात्री येथील ३, घाटंजी मधील सायतखर्डा, पुसद तालुक्यातील वसंतपूर, यवतमाळ येथील वडगाव रोड व उमरखेड तालुक्यातील ढाणकी उर्दू शाळेचे प्रत्येकी २ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेत आयोजित होणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. सेस फंडातून विजेत्यांना सायकल देण्याचेही नियोजन केले आहे. तसेच येत्या काळात या विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीवारी घडविली जाणार आहे.
दिल्ली दर्शन, विमान वारीचे मानकरी