अखेर " त्या " ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई
🔸दंड आकारण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल..
🔸वेगाव परिसरात वाळू माफियांचे धाबे दणाणले
मारेगाव : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा अवैधरित्या धुडगूस सुरू असतांना वेगाव परिसरात आज रविवारला वनविभागाच्या जाळ्यात एक मासा गळाला लागला. सखोल चौकशी अंती ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून या कारवाईत दंड आकारण्यास वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी ' विदर्भ सर्च न्यूज ' ला दिली.
तालुक्याच्या मार्डी , कुंभा सह वेगाव परिसरातील वाळू माफियांनी डोके वर काढीत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल लाटला.हे सर्वश्रुत असतांना आज वेगाव परिसरात प्रामुख्याने वनविभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या भागातून अवैध वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेत असतांना वनविभागाने छापा टाकला.सखोल चौकशी अंती 'वाळू वाहतूक' चे आलबेल असतांना वेगाव येथील पवन बापूजी जांभुळकर यांच्या ट्रँक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली.वनविभागाच्या अखत्यारीतील असलेल्या परिसरातून वाळूचा अवैध उपसा करणारा हा ट्रॅक्टर तूर्तास वनविभागात जमा करण्यात आला आहे.जप्ती बाबतचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर करण्यात आल्या नंतर लाखो रुपयांचा 'दंड' आकारण्यात येणार आहे.
वेगाव येथे निर्गुडा नदी व वनविभागाच्या अखत्यारीतील वाळू मोठ्या प्रमाणात आहे.त्याचा अवैध उपसा करीत परिसरातील अनेक माफिया रात्री बेरात्री व प्रामुख्याने शासकीय सुट्टीच्या दिवसाला आपले ईप्सित साध्य करीत शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचे सत्कार्य करीत असतात. मात्र आज एक माफिया वनविभागाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या कारवाईने वाळू माफियांचे पुरते धाबे दणाणले आहे.