घरातून दुचाकी केली लंपास
🔸मारेगाव प्रभाग १३ मधील घटना🔸तालुक्यात चोरटे झाले सक्रिय ,नागरिकांत भीतीचे वातावरण
🔸चोरट्यांना गजाआड करण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील ज्ञानेश्वर बिहाडे यांच्या निवासस्थानी गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.मारेगाव तालुक्यात वाढत्या चोरी प्रकरणाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये ज्ञानेश्वर बिहाडे यांचे वास्तव्य आहे.घरा समोर लोखंडी गेट असून आत एकूण तीन दुचाकी होत्या.अज्ञात चोरट्याने गेटला लावलेला ताला व सळाखीचा कोंडा चक्क टिकासच्या साहाय्याने तोडून एच एम डिलक्स दुचाकी क्रमांक एम .एच. २९ बी.बी.२०३८ या मोटारसायकलवर चोरट्यांनी हात साफ केला.दुचाकी चोरणारे चोरटे हे दोन ते तीन जन असावे व पहाटे तीन चार वाजताचे सुमारास दुचाकी चोरली असावी असा कयास व्यक्त होत आहे.
दरम्यान मारेगाव तालुक्यात चोरीच्या घटनेत कमालीची वाढ होत असतांना यापूर्वी मार्डी , कुंभा , मारेगाव बाजारवाडीतून सोन्याचे दागिने , लग्न समारंभात किशोर कांबळे यांची स्प्लेडर मोटारसायकल , आंबेझरी येथील रोख रक्कम व सोन्याचे दागिन्यांची चोरी व आज मारेगाव येथील दुचाकीची चोरीच्या घटनेने तालुका प्रभावित होत आहे.परिणामी या घटनेतील चोरटे पकडण्यास पोलिसांना अजूनही यश आले नसल्याने चोरट्यांना जेरबंद करण्याचे कडवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.मात्र तालुक्यात वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण होत आहे.