दोन वाळू तस्करांचे ट्रॅक्टर महसूलच्या गळाला
🔸लाखोचा महसूल लाटला🔸मारेगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील घटना
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील बहुचर्चित रेती माफिया कडून वारेमाप अवैद्य उपसा करणारे रॅकेट सक्रिय असतांना आज मंगळवारला महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर वाहनावर कारवाई करीत जप्त केले.या कारवाईने काही दिवसासाठी वाळू माफियांवर अंकुश बसणार आहे.
मारेगाव तालुक्यातील घाट , नाल्यातून वारेमाप अवैद्य वाळूचा उपसा हा जगजाहीर होता.याबाबतच्या अनेक तक्रारींचा ढीग प्रशासनच्या दरबारी चर्चेचा विषय ठरत असतांना लाखो रुपयांचा महसूलला चुना लावीत सराईत वाळू माफियांना आशीर्वाद नेमका कुणाचा होता हे सांगण्याची आता कुण्या ज्योतिष्याची गरज उरली नव्हती. दिवसरात्र चालणाऱ्या वाळू तस्करांचा लपंडाव कायम असतांना आज मंगळवारला मार्डी येथील मंडळ अधिकारी ए.वाय. घुगाने आपल्या कार्यक्षेत्रात कर्तव्यावर असतांना दापोरा शिवारातुन अवैद्य ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली .हे दोन्हीही वाहन चिंचमंडळ येथील रामदास गणपत चौधरी व अनिकेत कमलाकर झाडे यांचे मालकीचे असून दोन्ही वाहन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत जप्तीची कारवाई सुरू होती.परिणामी या कारवाईने अवैद्य वाळू तस्करांचे काही दिवसासाठी धाबे दणाणले आहे.
दरम्यान वाळू तस्करावर कारवाई होवू नये म्हणून या परिसरातील अनेक तस्करांनी एका राजकीय पक्षात प्रवेश करून आसरा घेतला होता.आणि तेव्हापासून कारवाईच्या बडग्याची तलवार म्यान झाली होती.यातून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडीत निघाला हे येथे विशेष.या कारवाईने महसूल विभाग अँक्शन मोडवर आले असून अनेकजण आता रडारवर आहे.