🔸डोंगरगाव शिवारातील घटना
🔸तब्बल पाच तासानंतर बालक आईच्या कुशीत..!
वणी : संतोष बहादुरे
दिवाळीत मामाच्या गावाला जाण्याची मज्जा काही औरच असते.मामाच्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी जाणे आणि त्यातच शेतात जाऊन मनसोक्त आनंद लुटणे हा पाहुण्यांचा लपंडाव चक्क लहानग्या भाच्यावरच बेतला. निमित्त पाणी पिण्याचे आणि शिवारात अलगद भटकंती, क्षणात दिसेनासा झालेल्या भाच्यामुळे आई वडीलासह मामाची पायाखालची वाळू सरकली.मनात वेदनेचे , दुःखाचे घर करून शोधाशोध सुरू झाली आणि तब्बल पाच तासानंतर हा सात वर्षाचा बाळ अनपेक्षित भटकंतीने वेगळ्या शिवारात सापडल्याने गणगोतांचा जीव भांड्यात आला अन सुटकेचा श्वास सोडला.ही वेदनादायी घटना डोंगरगाव शिवारात दि.१४ ला घडली.
आदू जयराम आत्राम सात वर्ष हा आपल्या मामाच्या गावाला (झरपट) दिवाळी साजरी करण्याकरिता आला.
आदु हा आई बाबा व मामा सोबत शेतामध्ये फिरण्या करिता गेला.मामा आपल्या कामांमध्ये असताना आदू याने पाणी पितो म्हणून सांगून तो शेतामधील गोठ्याकडे निघाला मात्र शेतामधील गोठ्याचा मार्ग विसरून डोंगरगाव सोमनाळा शेतशिवारात शिरला.
बराच वेळ झाला तरी आदू पाणी पिऊन का नाही आला म्हणून त्याच्या आई बाबाला विचारपूस केली व गोठ्याकडे जाऊन बघितलं तर आदु दिसेनासा झाला.शोधा शोध सुरू झाली मात्र आदु चा कुठे थांगपत्ता लागत नव्हता.
आदूच्या मामाने संपूर्ण शेतामध्ये व शेतालगत शेतकऱ्यांना विचारपूस केली मात्र आदूचा पत्ता लागत नसल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढत होते.
अशातच एका वेगळ्या शेतात दूरवर असलेल्या सुरेखा प्रभाकर पिंपळकर या शेतकरी महिलेला आदूच्या रडण्याचा आवाज आला. तिने विचारपूस केली असता आदू हा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत नाव सांगू शकत नव्हता. त्या महिलेने ममता दाखवीत त्याला आपल्या घरी आणले. डोंगरगाव येथील पोलीस पाटील यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील यांनी मारेगाव व वणी येथील पोलीस स्टेशनला कुणाचातरी मुलगा हरवल्याची माहिती दिली .
त्यानंतर काही तासामध्ये त्याचे वडील व आई हे आदूला शोधत डोंगरगाव येथे आले गावातील गावकऱ्यांनी आदू मिळाला याची माहिती मुलाच्या आई बाबा व मामा यांना दिली.
आदूची माहिती मिळताच आई-बाबांनी त्या महिलेच्या घरी धाव घेतली पोटच्या गोळ्याला सुखरूप पाहून कवेत कवटाळून घेतले .तब्बल पाच तासाच्या अलगद व अनपेक्षित लपंडावाने माय बापाचा जीव भांड्यात आला.एका शेतकरी महिलेने पाहुणा म्हणून आलेल्या आदु ची शिवारातील भटकंतीला पूर्णविराम दिला आणि आदु आई बाबाच्या कुशीत गेला. आणि काही तासाच्या वेदनेवर हर्षाची फुंकर पडली.