🔶शेतकरी आर्थिक विवंचनेत
🔶तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
विदर्भ सर्च न्यूज। कैलास ठेंगणे
मारेगांव, (०७.ऑक्टो ) तालुक्यात मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने चागलाच घोर घातला आहे. त्यामुळे सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कपाशी वर लाल्या सदृश्य रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले असून पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांना लगबगीचे प्रयत्न करावे लागणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य असून दर्जेदार कापसामुळे या परिसराला संपूर्ण एक वेगळी ओळख आहे. कॉटन बेल्ट म्हणून प्रसिध्द असलेल्या या भागातील लांब धाग्याच्या कापसामुळे भावातही नेहमी तेजी राहत असते.या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने कपाशीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र नंतर ठराविक कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने या पिकाची पाहिजे ती वाढ होऊ शकली नाही. त्यातच सुरवातीला मावा व तुडतुडयांनी हल्लाबोल केल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधीने घायाळ केले. त्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच थ्रीप्स व फुलकिड्याचे कपाशी पिकावर आक्रमण झाले. त्यासाठीही वेगवेगळ्या शिफारस केलेल्या औषधीचा फवारा करूनही त्यातूनही पाहिजे ते रिझल्ट मिळाले नाही.

सध्या या परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला या पावसामुळे तरी काही प्रमाणात थ्रीप्स व फुलकिडे नियंत्रणात आली आहेत. या तालुक्यातील शेतकरी कपाशीचे चांगेल उत्पादन घेतो. मात्र त्यासाठी या पिकाची काळजी घेण्यास कोणतीही कमतरता ठेवत नाही. भरमसाठ खर्च करून हे उत्पादन घेतले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी सद्या मेटाकुटीस आला आहे. आज रोजी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील गावात शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या सदृश रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने लाल होत असून ती करपत आहेत. पाती गळ होत आहे. कपाशीचे केवळ आता काड्याच बाकी असल्याची स्थिती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे.
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यां कडून होत आहे.