विदर्भ सर्च न्यूज 丨कैलास ठेंगणे
मारेगाव ,(5 ऑक्टो.) कुंभा, करणवाडी ते खैरी रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडून चाळणी झाली. आजपर्यंत अनेक वेळा सामाजिक व राजकीय संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी करून ही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही झाले नाही. त्यामुळे वाहनधारकांना तसेच दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन धरून प्रवास करावा लागत असल्याने ओ सेठ, या रस्त्याने आम्ही सुरक्षित जाऊ का थेट ?असा सवाल बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रवासी विचारत आहे.
कारण वाडी ते कुंभा ते खैरी या 20 किमी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली .या रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते .परंतु वाहनधारकांना व प्रवाशांना खड्ड्यांमुळे हा रस्ता डोकेदुखीचा ठरू लागला आहे. त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यात वाहने जाऊन खड्ड्यांची संख्या व त्याचे आकारमानही दिवसागणिक वाढत चालल्यामुळे वाहन चालकाची वाहन चालविताना त्रेधातिरापीट उडते. परिणामी अंदाज न आल्याने किंवा रस्त्यावरील खड्ड्याने अनेक वेळा अपघात होत आहे. सद्यस्थितीत तर अनेक ठिकाणी रस्ताच गायब होऊन फक्त खड्डे दिसत असल्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवण्यासाठी रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी दीड तासाचा अवधी लागत आहे. एवढे सर्व होत असताना देखील हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती बाबत कोणतीही हालचाल केल्याचे दिसून येत नाहीं . हे या रस्त्यावरून जाणार्या प्रत्येकाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
या मार्गाला कोणीच वाली नाही?
या मार्गावरील वाहनधारक व प्रवाशांचे हित लक्षात घेता या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष घालून या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रश्न मार्गी लावून जनहिताचा प्रश्न लवकर सोडविण्याची गरज आहे. मात्र वारंवार दुरुस्ती व डांबरीकरणाची मागणी करूनही कोणीच लक्ष देत नसल्याने या रस्त्याला कोणी वालीच नाही का ?असा सवाल सर्वसामान्य नागरिक व प्रवासी वाहनधारकांकडून मधून होत आहे.
मेरे भाई ये कैसे हुआ
शोले चित्रपटातील जय वीरू ची जोडी अजरामर आहे. या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो लावून मेरे भाई ये कैसे हुआ असा प्रश्न जय विचारताना दाखवून करणवाडी कुंभा जा रहा था ? त्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाला असं चित्र समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे.