तहसीलदारास तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !
अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी आरोपी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर १५ हजार या प्रमाणे ३० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता.
भंडारा : कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्याकरता ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याचे तहसीलदारास भंडारा लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
देविदास बोंबुर्डे असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. लाच प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यामुळे सध्या भंडारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून जिल्ह्यातील तलाठी, बाबुंचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या २ ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी आरोपी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर १५ हजार या प्रमाणे ३० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता. मात्र तक्रारदार वाळू व्यावसायिकास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत विभाग गाठत याबाबत तक्रार दिली.
तक्रारीची शहानिशा करून आज सापळा रचत लाचलुचपत विभागाने या तहसीलदारास 30 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आरोपी तहसीलदार विरुद्ध लाच प्रतिबंधित कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ही वाळू वाहतुकीतून मिळणाऱ्या मलाईपोटी अनेक अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. लाच लुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असणार एवढे मात्र निश्चित