सातेफळ शिवारात वाघाने केली वासराची शिकार..
परिसरात भीतीचे वातावरण
वर्धा
सचिन महाजन/जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- तालुक्यातील सातेफळ येथे वाघाने वासराला ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये दहशत वातावरण निर्माण झाले असून या परिसरात वाघ असल्याचे शेतकरी तसेच शेतमजूर शिवारातील शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याचे दिसुन येत आहे.सदर प्रकरणी वनविभागाची पथक सातेफळ शिवारात दाखल झाले असून डीएफओ खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
सातेफळ येथील शेतकरी वंसतराव घवघवे याच्या शेतात आज एक वासरू मृतावस्थेत आढळले असल्याने शेतकरी घवघवे यांचे गावा लगत असलेल्या शेतातच निवासस्थान आहे.सदर घटना तेथेच घडली असून सकाळी गावकरी घवघवे यांचे शेतात गेले असता त्यांचा अडीच वर्षे वयाच्या
वासराला वाघाने गंभीर जखमी करुन ठार केले असल्याचे निदर्शनास आले. सदर घटना त्यांनी वनविभागास कळविल्यानंतर आज दि.६ रोजी वन विभागाच्या चमुने तसेच महसुल विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी संबंधित शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सातेफळ परिसरात या घटनेची वार्ता पसरल्यामुळे शेतकऱ्यांनी वाघाचा शोध घेऊन तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वनविभागाच्या कर्मचारी श्रीमती श्रीरामे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला,घटनास्थळी वाघाच्या पाऊलखुनासुद्धा आढळून आल्या.
वनविभागाच्यावतीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.