Type Here to Get Search Results !

आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांशी लवकरच बोलणार; नाना पटोलेंचे मोठे विधान

आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांशी लवकरच बोलणार; नाना पटोलेंचे मोठे विधान

नाना पटोले यांनीही २०२४ ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे केले स्पष्ट

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निडवणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही २०२४ ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडी करण्यासाठी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नाना पटोले आज अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पटोले यांनी हे मोठे विधान केले. २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असे पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी त्यांनी ‘सामना’तील अग्रलेखावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना तिरकस टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो, असा टोला त्यांनी लगावला.

पवार काल काय म्हणाले होते?
काल राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणुका शिवसेनेसोबतच लढण्याचे संकेत दिले होते. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले. त्या दिवसापासून हे सरकार टिकण्याबाबत सतत चर्चा होत होती. किती दिवस? किती आठवडे? किती महिने?, एखादे वर्ष हे सरकार टिकेल, अशी चर्चा होत होती. पण आता ती चर्चा होत नाही. काल-परवा थोडीबहुत चर्चा झाली. पण मला त्याची चिंता वाटत नाही. राज्याचे शिष्टमंडळ मोदींना भेटले. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेते स्वतंत्र बसले. काही चर्चा विचारविनियम केला. कुणी काही करो, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका वावड्या उठवल्या गेल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शिवसेना आली आहे. सेनेसोबत कधी काम केले नाही. महाराष्ट्र अनेक वर्षांपासून सेनेला पाहतो आहे. त्यानुसार सेना विश्वास असणारा पक्ष आहे. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना भूमिका सोडणार नाही. कुणी असे काही मांडत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहत आहेत, असे म्हणावे लागेल, असे सांगतानाच हे सरकार पाच वर्षे टिकेल. नुसतेच पाच वर्षे टिकणार नाही तर उद्याच्या लोकसभा- विधानसभेला हे सरकार जोमाने काम करेल. या बद्दल माझ्या मनात शंका नाही, असे पवारांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies