निकृष्ट दर्जाचे पुलाचे बांधकाम
सार्वजनिक बांधकाम अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे तक्रार
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
पंकज नेहारे
मारेगाव: सध्या मारेगाव शहरात विकास कामे सुरू आहेत. यात संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तथा पाहणी केली जात नसल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकही ओरड करीत असताना कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पावसापूर्वी कामे उरकण्याच्या लगीनघाईने कंत्राटदार शर्मा यांनी प्रभाग क्रमांक १मधून धामणी रस्ताला जोडणारा पांदन रस्ताच्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याची तक्रार स्वप्निल नागोशे यांनी सार्वजनिक बांधकाम यवतमाळ यांच्या कडे तक्रार दाखल केली असून निकृष्ट दर्जाच्या पुलाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.येथील वार्ड क्र.१ अंतर्गत येणाऱ्या पांदन रस्ताच्या पुलाचे बांधकाम केले असुन ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रभाग क्रमांक १ मधील नागरीकांनी वरिष्ठाकडे तक्रार दिली आहे . कामाच्या ठिकाणी सूचना तथा माहिती फलक लावणे गरजेचे असते; पण या परिसरात कुठेही फलक लावल्याचे दिसून येत नाही. सदर फलकावर कामाचे नाव, स्वरूप, कामाची किंमत, कंत्राटदाराचे नाव आणि विभागाचे नाव नमूद केले जाते; पण कंत्राटदाराने कुठलाही फलक न लावताच काम करीत आहे.सदर कामासाठी वापरले जात असलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. यावरून स्वप्रिल नागोशे यांच्या सह काही नागरीकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यात सदर काम नावापूरतेच केले जात असल्याचे दिसून आले. पावसाळ्यात पहिल्या पुरातच सदर पूल वाहून जाण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. यासाठी वापरण्यात येणारी वाळू व मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. यामुळे तक्रार वरिष्ठा कडे करण्यात आली असुन वरिष्ठ अधिकारी कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर काय कारवाई करते याकडे वार्ड क्रमांक १च्या नागरिकांचे लक्ष लागले आहे