आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे विचार जनमानसात पोहचवा: सुशिलकुमार पावरा
मारेगाव वार्ता
रत्नागिरी:प्रतिनिधी
रत्नागिरी: आज २ मे रोजी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन. राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८०५ रोजी एका महादेव कोळी परिवारात झाला. त्यांचे मूळ गाव देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान आहे. परकीय सत्तेविरोधात लढणा-या आदिवासी बंडखोरांमध्ये राघोजी भांगरे हा एक भक्कम, ताकदवान, धाडसी बंडखोर नेता
होता. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले ,घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या शिलेदारी,वतनदारी काढल्या. बुरूज नष्ट केले. पगार देणे कमी केले. इंग्रजांनी परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याच कालावधीत शेतसारा वाढवण्यात आला. शेतसारा वसुलीमुळे गोर गरीब आदिवासी बांधवांना रोख पैशांची गरज भासू लागली. कर्ज वसूली करताना सावकार मनमानी करू लागले. कर्जाच्या मोबदल्यात आदिवासींच्या जमिनी बळकावू लागले.म्हणून आदिवासी बांधव सावकारांवर व इंग्रजांवर चिडले.
राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी सावकार व इंग्रजांविरोधात बंडखोरीला सुरवात केली. यातच इंग्रजांनी अकोले तालुक्यातील रामा किरवा यांना पकडून तुरुंगात १८३० साली फाशी दिली. यामुळे महादेव कोळी बंडखोरांमध्ये दहशत पसरेल,भिती निर्माण होईल असे इंग्रजांना वाटले. राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी मोठ्या नोकरीवर घेतले ,जेणेकरून राघोजी भांगरे हे बंडखोरीत शामिल होऊ नये. परंतु राघोजी भांगरे यांचा तेथे अपमान व कटछाट होत असल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी बंडात उडी घेतली. १८३८ साली राघोजी भांगरे यांनी रतनगड व सनगर किल्ल्याच्या परिसरात मोठे बंड उभारले. हे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मार्किनटोशने अवघड खिंडी,रस्ते,जंगले यांची मिळवली.बंडखोरांची गुपिते बाहेर काढली.तरीही बंडखोर नमले नाहीत. उलट बंडाने उग्र रूप धारण केले. इंग्रजांनी अनेक अडचणी निर्माण करायला सुरुवात केली. माहिती घेऊन ८० लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले. राघोजींचे बंड १८४४ ते १८४५ या कालावधीत शिगेला पोहचले. बंड उभारल्यानंतर आपण स्वतः शेतक-यांचे व गरीबांचे कैवारी असून इंग्रज व सावकारांचे वैरी आहोत.हे जाहीर केले.
राघोजी भांगरे हे चारित्र्यवान होते. स्त्रीयांबद्धल त्यांना खूप आदर होता. महादेवावर त्यांची श्रद्धा व भक्ती होती. भिमाशंकर, त्र्यंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे ते बंडाच्या कालावधीत दर्शनाला जात असत.
२ जानेवारी १८४८ साली इंग्रजांचे लेफ्टनंट गेल यांनी राघोजींना पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठी अटक केले. कसलाही विरोध न करता राघोजींना स्वतः ला पोलिसांच्या स्वाधीन केले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या महान क्रांतीकारकाला सोडवण्यासाठी कुणीही वकील पत्र दिले नाही. राघोजी भांगरे यांची बाजू कोणत्याच वकीलाने मांडली नाही, न्यायादिशाने एकतर्फी निर्णय देऊन राघोजींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.
बंडाचा झेंडा फडकवणा-या राघोजी भांगरे यांना २मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. राघोजी भांगरे या महान क्रांतीकारकाच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन करत समाजसेवक सुशीलकुमार पावरा यांनी राघोजी भांगरे यांचा इतिहास व विचार जनमानसात पोहचवा,असे आदिवासी बांधवांना आवाहन केले आहे.