अखेर मृत महिलेचे प्रेत नेले
घनकचरा गाडीत!
सफाई कामगारांनी दिला भडाग्नी
कोरोना सदृश स्थितीचा फटका
मारेगाव : सचिन मेश्राम
' ती ' चा अचानक मृत्यू..कोरोना बाधीत असल्याचा संशयकल्लोळ..कोणीही जवळ जाण्यास धजावत नसल्याने एकुलत्या मुलीने प्रशासन गाठले..अंतीम संस्कार करण्याची याचना करित अखेर नगरपंचायत प्रशासन सरसावले..आणी घनकचरा वाहून नेणार्या वाहनातून प्रेत थेट स्मशानभूमीत नेवून सफाई कामगारानेच दिला भडाग्नी..ही घटना आहे मारेगाव शहरातील प्रभाग क्रं. १६ येथील एका ६१ वर्षीय महिलेची.
शहरातील प्रभाग क्रमांक सोळा येथील वास्तव्यात असलेली ६१ वर्षीय महिला गेल्या दोन चार दिवसापासून प्रकृती अस्वस्थाने आजारी होती.प्राथमिक स्वरुपाचे उपचार करुन मायलेकीने सोबत रविवारच्या सायंकाळचे जेवन घेतले.आणी रविवार च्या रात्री अचानक 'ती' चा मृत्यू झाला.
तुर्तास कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतांना ती चा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला असावा असा कयास प्रभागात व्यक्त होत होता.त्यामुळे कोणीही प्रेताजवळ जाण्यास धजावत नव्हते.एकुलती एक मुलगी हा सर्व प्रकार डोळ्यात साठवित हतबल झाली.इकडे तिकडे मदतीची याचना करु लागली.मात्र कोरोना संसर्गाचा प्रकोप असल्याने प्रभागातीलच काय तर गणगोतांनीही या दु:खदायी प्रसंगा कडे पाठ फिरविली.सदर महिलेचे प्रेत तब्बल १४ तास घरातच असल्याने मुलीची पुरती भंबेरी उडाली.
अखेर मुलीने मारेगाव येथील प्रशासन गाठले.प्रेताचा सोक्षमोक्ष लावण्याचे आविचार विषद करुन पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठीत परिस्थितीचा मागोवा घेतला.नगरपंचायत प्रशासनास कळवित हे प्रशासन सरसावले आणी घनकचरा नेणार्या वाहनातून मृतक महिलेचे प्रेत थेट स्मशानभूमीत नेत सफाई कामगार यांनी प्रेताला भडाग्नी दिला.या घटनेने सर्वांच्या मनातील कालवाकालव अखेर तब्बल १४ तासानंतर थांबली.कोरोना सदृश्य फ़टक्याने मानवी जीवनाच्या अखेरच्याही क्षणात कशी त्रेधातीरपट उडते याचा अनुभव मारेगावकरांनी मात्र डोळ्यात अन मनात साठवला एवढे मात्र खरे.