मारेगावात पोलिसातील माणुस हरविल्याचा प्रत्यय ?
सामान्य जनतेवर होतोय अन्याय
उचलबांगडी करण्याची मागणी
पिडीताची वरिष्ठाकडे तक्रार
मारेगाव : दीपक डोहणे
कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु असतांना प्रशासनाच्या बेताल भूमिकेने मारेगाव शहरात व तालुक्यात पुरता फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.यातच अवैद्य मदिरेचा खपही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.नव्हे तर चक्क लॉकडाऊन मध्ये खुलेआम दारुचे दुकान सुरु ठेवून पोलिसाच्या व अबकारी खात्याच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मात्र सर्वसामान्य जनता बाहेर पडली की त्याचे कॉलर पकडण्या पर्यंत मजल गाठली जात आहे.यातील काही दादा तळीरामच्या भुमिका वटवित असतांना अकारण एकास गुरुवारच्या रात्री अपमानित करणारी घटना घडल्याने व ती जिव्हारी लागल्याने बहुचर्चित पोलिसांची उचलबांगडी करण्याची मागणी करीत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पोलिसांनी खाकी वर्दी चढवीली की नाती,गोती,वैयक्तीक मते विसरुन नि:पक्षपाती कामे केली पाहिजे. अशी रास्त अपेक्षा पोलिसांकडुन असते.तो सर्वांचाच रक्षणकर्ता असतो.त्याच्या समोर येणार्या अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे आणि अन्याय करणार्याला तुरुंगात डांबणे अशी साधारणपणे व्यवस्थेची रचना आहे.सद्या नेमके उलट होतांना दिसते आहे.शहरासह तालुक्यात नजरेआड व खुलेआम अवैद्य दारु विक्री जोरकसपणे सुरु असतांना याकडे कमालीचे दुर्लक्ष सर्वकाही सांगून जात आहे.यात सवंगडी झिंगलेल्यावस्थेत कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करित आहे.अकारण सर्वसामान्य जनतेला कपडे पकडत मारण्याचा प्रयत्न होत असतांना या विभागातील काही असवेदंनशील व्यक्तीमुळे ही वर्दीच संशयाच्या भोवर्यात सापडत आहे.त्यामुळे पोलिस आणी जनता यांच्यातील विश्वासाची जागा आता टिकेने घेतली आहे.
गुरुवार च्या रात्री मारेगाव शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असतांना प्रभाग क्रमांक अकरा मधील एक युवक डास आणी उकाड्याने त्रस्त झाल्याने घराबाहेर निघाला.यावेळी पोलिस वाहन येत असल्याचे दिसताच तो युवक घराकडे वळला.पोलिस वाहन समोर जावुन मागे घेतात.यात एक अधिकारी,जमादार व चालक खाली उतरत चक्क विचारपुस न करता अतिशय शेलक्या शब्दात भडिमार करित कपडे पकडीत मारण्याचा प्रयत्न करतात.तेवढ्यात पिडीत युवकाचे वडील येतात झालेल्या प्रसंगावरून शाब्दिक खडाजंगी होवून खाकी वर्दी वाहनसह रवाना होतात.
सदर घटनेत पोलिसांची कोणतीही सौजन्याची भुमिका नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.बहुदा अवैद्य व्यवयासाची पाठराखण करित खुलेआम दारु दुकान सुरु असतांना यावर कारवाईला भोपळा दाखवून सर्वसामान्य जनतेला मात्र अकारण त्रास देण्यास माहीर झालेल्या पोलिसांच्या या भुमिकेकडे संशयाने बघितल्या जात आहे.या घटनेमुळे पोलिसा बद्दल अनामिक भिती व संताप सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.पोलिसा मधील कोडगेपणाची अवस्था सामान्य जनतेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी घातक ठरू पहात असल्याने याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आल्याने या बहुचर्चित पोलिसांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.